काबुलमधील ‘आयएस’चे ठिकाण उद्ध्वस्त केल्याचा तालिबानचा दावा

‘आयएस’चे ठिकाणकाबुल – रविवारी काबुलच्या प्रार्थनास्थळाच्या आवारात बॉम्बहल्ला चढविणार्‍या ‘आयएस’च्या दहशतवाद्यांचा बंदोबस्त केल्याचा दावा तालिबानने केला. राजधानी काबुलमधील आयएसचे ठिकाण उद्ध्वस्त केल्याचे तालिबानने जाहीर केले. या कारवाईत आयएसचे तीन दहशतवादी ठार झाले असून ११ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती तालिबानने दिली.

काबुलमध्ये ईदगाह प्रार्थनास्थळाच्या आवारात झालेल्या स्फोटात १२ जणांचा बळी गेला तर ३०हून अधिक जण जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारली नाही. पण तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिदच्या दिवंगत आईसाठी प्रार्थना करण्यासाठी जमा झालेल्या तालिबानच्या दहशतवाद्यांवरील या हल्ल्यामागे ‘आयएस-खोरासन’ असल्याचा आरोप तालिबानने केला.

रविवारी संध्याकाळीच तालिबानच्या दहशतवाद्यांनी काबुलच्या एका भागात केलेल्या कारवाईची माहिती मुजाहिदने दिली. तालिबानच्या स्पेशल युनिटने यशस्वीरित्या ही कामगिरी पार पाडल्याचे मुजाहिदने सांगितले. या कारवाईत आयएसचा तळ नष्ट केल्याचे तालिबानने म्हटले आहे. या व्यतिरिक्त तालिबानने ताब्यात घेतलेल्या आयएसच्या दहशतवाद्यांबाबत कुठलीही माहिती उघड केली नाही.

पण रविवारी रात्री उशीरापर्यंत काबुलच्या सेवेंटिन्थ कॉन्स्टिट्युएन्सी भागात जोरदार गोळीबार सुरू असल्याच्या बातम्या स्थानिक माध्यमे देत होती. काही ठिकाणी आगीचा डोंब उसळल्याचे फोटोग्राफ्सही या माध्यमांनी प्रसिद्ध केले. त्यामुळे काबुलमध्ये तालिबान आणि आयएस या दोन्ही दहशतवादी संघटनांमध्ये जोरदार संघर्ष पेटल्याचे दावे केले जात होते.

‘आयएस’चे ठिकाणतालिबानने काबुलचा ताबा घेतल्यानंतर रविवारी झालेला स्फोट हा अफगाणिस्तानातील सर्वात मोठा स्फोट मानला जातो. याआधी २६ ऑगस्ट रोजी काबूल विमानतळावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी आयएस-खोरासन या दहशतवादी संघटनेने घेतली होती. अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील नांगरहार या प्रांतात आयएस-खोरासानचे वर्चस्व आहे. नांगरहार प्रांताची राजधानी जलालाबादमध्ये खोरासनच्या दहशतवाद्यांनी तालिबानी दहशतवाद्यांच्या वाहनांना लक्ष्य केले होते.

रविवारी काबुल येथील प्रार्थनास्थळाच्या आवारात झालेला बॉम्बस्फोट व त्यानंतर तालिबान आणि आयएसच्या दहशतवाद्यांमध्ये पेटलेल्या संघर्षानंतर, अमेरिकेतील आघाडीच्या विश्‍लेषकाने इशारा दिला. अफगाणिस्तान पुन्हा एकदा दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनण्याची शक्यता रविवारच्या स्फोटानंतर बळावली आहे, असे ‘गेटस्टोन इन्स्टिट्युट’ या अमेरिकी अभ्यासगटाचे विश्‍लेषक कॉन कॉघ्लिन यांनी बजावले.

‘अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीचा फायदा घेऊन, इतर दहशतवादी संघटना अफगाणिस्तानात सामर्थ्यशाली बनू लागल्या आहेत. हे अफगाणिस्तानसह जागतिक सुरक्षेसाठी धोकादायक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या वेगवान सैन्यमाघारीच्या निर्णयाचे दूरगामी परिणाम पुढील काही वर्षे पाश्‍चिमात्य देशांच्या सुरक्षेवर होतील’, असा गंभीर इशारा कॉघ्लिन यांनी दिला. अमेरिकेतील लोकप्रतिनिधी व निवृत्त लष्करी अधिकारी देखील बायडेन यांच्या अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीच्या निर्णयावर कोरडे ओढत आहेत.

leave a reply