जर्मन यंत्रणांकडून तुर्कीच्या हेराला अटक

- हल्ल्याचा कट उधळला

अटकबर्लिन/अंकारा – तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांचे विरोधक असणार्‍यांवर हेरगिरी करून हल्ला करण्याचा कट जर्मन यंत्रणांनी उधळून लावला. याप्रकरणी तुर्कीच्या गुप्तचर यंत्रणेसाठी काम करणार्‍या संशयिताला अटक करण्यात आली. तुर्कीच्या एर्दोगन राजवटीने या विरोधकांना आपल्या ताब्यात देण्यासंदर्भात जर्मनीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. आता तुर्की अशा विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठी हेरगिरी करीत असल्याचे उघड झाल्याने जर्मनी व तुर्कीमधील संबंध बिघडण्याची शक्यता वर्तविण्यात येतेे.

जर्मन ‘एसईके स्पेशल फोर्स’ने गेल्या महिन्यात डुसेलडॉर्फ शहरातील एका हॉटेलवर छापा टाकला. या छाप्यात अली डी. या ४० वर्षाच्या संशयिताला अटक करण्यात आली. त्याच्याकडे शस्त्रसाठा सापडला आहे. अधिक तपासानंतर अली तुर्कीची गुप्तचर यंत्रणा ‘एमआयटी इंटेलिजन्स सर्व्हिस’साठी काम करीत असल्याचे उघड झाले. अली जर्मनीच्या कोलोन भागात ‘गुलेन मुव्हमेंट’साठी काम करणार्‍या अथवा त्याचे सदस्य असलेल्यांची माहिती गोळा करीत होता. या गटासाठी काम करणार्‍यांची हत्या करण्याचा कटही त्याने आखला होता, अशी माहिती समोर येत आहे.

अटकफेतुल्लाह गुलेन तुर्कीतील प्रभावशाली धर्मगुरुंपैकी एक असून सध्या अमेरिकेत आश्रयास आहेत. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांच्या मार्गदर्शकांपैकी एक म्हणून गुलेन यांचा उल्लेख होतो. मात्र काही काळाने त्यांच्यात वितुष्ट आल्याने राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी गुलेन व त्यांच्या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले होते. २०१६ साली तुर्कीत झालेल्या अपयशी बंडामागे गुलेन यांचा हात असल्याचा आरोपही एर्दोगन यांनी केला आहे. त्यानंतर एर्दोगन यांनी गुलेन यांच्यासह त्यांच्या गटाविरोधात आक्रमक मोहीम हाती घेतली आहे.

गेल्या काही वर्षात तुर्की यंत्रणा तसेच राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या समर्थकांनी आफ्रिकी तसेच युरोपिय देशांमध्ये गुलेन यांना पाठिंबा देणार्‍यांना लक्ष्य केल्याचेही समोर आले होते. जर्मनीतील हेरगिरी व संभाव्य हल्ल्याचा कटही याचाच भाग असल्याचे दिसत आहे. युरोपमधील सर्वाधिक तुर्कीवंशियांचे वास्तव्य असलेला देश म्हणून जर्मनी ओळखण्यात येतो. जर्मनीत ७० लाखांहून अधिक तुर्कीवंशिय वास्तव्यास आहेत. या तुर्कीवंशियांसह इतर युरोपिय देशांमधील तुर्की नागरिकांवर प्रभाव टाकण्यासाठी राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी पद्धतशीर प्रयत्न सुरू केल्याचे उघड झाले होते.

एर्दोगन यांच्या या प्रयत्नांना युरोपिय देशांमधून जोरदार विरोधही झाला होता. युरोपातील प्रमुख देशांनी तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी उभे केलेले नेटवर्क मोडून काढण्यासाठी हालचालीही सुरू केल्या होत्या. या कारवाईमुळे युरोपिय महासंघ व तुर्कीत तणावही निर्माण झाल्याचे समोर आले होते. या पार्श्‍वभूमीवर जर्मन यंत्रणांनी केलेली कारवाई महत्त्वाची ठरते.

leave a reply