तालिबानच्या कमांडरकडून पाकिस्तानच्या ‘आयएसआय’चा पर्दाफाश

नवी दिल्ली – अमेरिका आणि तालिबानमधील चर्चेसाठी मध्यस्थी करुन पाकिस्तानने अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पण दहशतवादाचा नंदनवन म्हणून कुख्यात असलेला पाकिस्तान अजूनही दहशतवादाचा वापर भारताच्या विरोधात करीत असल्याचे नव्याने उघड झाले आहे. तालिबानचा कमांडर एहसानुल्लाह एहसान याने पाकिस्तान गुप्तचर यंत्रणा आयएसआय’वर केलेले गंभीर आरोप याचीच साक्ष देत आहेत. पाकिस्तानने काश्मीरसाठी पुकारलेल्या जिहादमध्ये तालिबाननेही सहभागी व्हावे, यासाठी आयएसआय’ अक्षरश: भीक मागत होती, असा दावा वर्तमानपत्रासाठी लिहिलेल्या एका लेखात एहसानुल्लाह एहसान याने केला आहे.

तालिबानच्या कमांडरकडून पाकिस्तानच्या ‘आयएसआय’चा पर्दाफाशपुढच्या महिन्यात ‘फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स’ची (एफएटीएफ) बैठक पार पडणार आहे. त्याआधी एहसानने पाकिस्तानबाबत केलेला खुलासा या देशाला अधिकच संकटात टाकणारा ठरतो आहे. जम्मू-काश्मीरमध्ये होणार्‍या दहशतवादी हल्ल्यांशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा पाकिस्तान करीत आला आहे. अगदी उरीमधील दहशतवादी हल्ल्याबाबत भारताने दिलेले पुरावेही पाकिस्तानने नाकारले आहेत. पण तालिबानचा माजी प्रवक्ता एहसानुल्लाह एहसान याने ‘आयएसआय’बाबत दिलेली माहिती पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरू शकते.

२०११ साली पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’चे तत्कालिन प्रमुख जनरल शूजा पाशा यांनी पाकिस्तानातील तालिबानचा वरिष्ठ कमांडर ‘मौलाना वली-उर-रहमान’ याला पत्र लिहिले होते. यामध्ये ‘आयएसआय’च्या माजी प्रमुखांनी तालिबानला ‘लश्कर-ए-तोयबा’ आणि ‘जैश-ए-मोहम्म्द’ या दहशतवादी संघटनांबरोबर काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये उतरण्याची खुली ‘ऑफर’ दिली होती. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय’च्या नेतृत्त्वाखाली ‘लश्कर’ आणि ‘जैश’ यांनी काश्मीरमध्ये सुरू केलेल्या ‘गजवा-ए-हिंद’ अर्थात भारतावर विजय मिळविण्यासाठीच्या युद्धात सहभागी होण्यासाठी भीक मागितली होती.

तालिबानच्या कमांडरकडून पाकिस्तानच्या ‘आयएसआय’चा पर्दाफाशत्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरातून टाकल्या जाणार्‍या दबावाची पर्वा न करता, पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरू ठेवल्या आहेत, असे सांगून शूजा पाशा यांनी मौलाना वली-उर-रहमान याला या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्याची विनंती केली होती. वली-उर-रहमान याचे नातेवाईक काश्मीरच्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी झाल्याची आठवण करुन देत तालिबानला यात खेचण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी तालिबानने अफगाणिस्तानात तैनात अमेरिका आणि नाटोच्या जवानांवर हल्ले सुरू ठेवावेत, असे सुचविले होते. अमेरिकी आणि नाटोच्या सैन्याला अफगाणिस्तानातून माघार घेण्यास भाग पाडल्यास पाकिस्तान तालिबानला फार मोठी रक्कम बहाल करील, असेही आयएसआयच्या प्रमुखांनी आमिष दाखविले होते. मात्र वली-उर-रहमान याने जम्मू-काश्मीर तसेच अफगाणिस्तान बाबतचा प्रस्ताव ‘आयएसआय’ने दिलेला प्रस्ताव नाकारला होता, अशी माहिती एहसान याने दिली.

कधी तरी अमेरिका व नाटोचे लष्कर अफगाणिस्तानातून माघार घेईल व त्यानंतर तालिबानचा वापर करुन भारतात दहशतवादाचे थैमान घालण्याचे स्वप्न पाकिस्तानचे लष्कर पाहत आले आहे. यासाठी पाकिस्तानचे लष्कर अफगाणिस्तानातील तालिबानच्या कारवायांना प्रोत्साहन देऊन सर्वतोपरी सहाय्य करीत होते. या आरोपांनाही आता एहसानुल्लाह एहसानने उघड केलेल्या माहितीमुळे पुष्टी मिळाली आहे.

leave a reply