ड्युरंड सीमेच्या वादावरुन पाकिस्तान तालिबानला ब्लॅकमेल करीत आहे

- माध्यमांचा दावा

ड्युरंडइस्लामाबाद/काबुल – अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला विभागणारी ड्युरंड सीमा अमान्य केली तर, यापुढे अफगाणींसाठी सीमेवरील वाहतूक बंद करण्यात येईल, असा इशारा पाकिस्तानने तालिबानला दिला. पण तालिबानने पाकिस्तानची ही शर्त धुडकावल्याचा दावा दि सिंगापूर पोस्ट या वर्तमानपत्राने केला. यावर पाकिस्तान किंवा तालिबानकडून प्रतिक्रिया आलेली नाही. पण तालिबानचा प्रमुख मुल्ला अखूंदझदा याने तालिबानच्या दहशतवाद्यांना संघटनेतील घुसखोरांपासून सावध राहण्याचा इशारा दिल्याची माहिती समोर येत आहे.

१८९३ साली ब्रिटिश अधिकारी मॉर्टीमर ड्युरंड याने अफगाणिस्तानची सीमा निश्‍चित केली होती. पण सध्याचा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील ही २,६७० किलोमीटर लांबीची ही सीमा अफगाणिस्तानातील पश्तून बांधवांना त्यांच्या भूभागापासून विभागणारी ठरली होती. गेली कित्येक दशके अफगाणिस्तानातील राज्यकर्ते, लोकशाहीवादी नेते तसेच तालिबानसारख्या दहशतवादी संघटनेला ही ड्युरंड लाईन मान्य नाही.

ड्युरंडअफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई व त्यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या अश्रफ गनी यांनी देखील पाकिस्तानबरोबरची ड्युरंड लाईन धुडकावली होती. तसेच पाकिस्तानचे लष्कर अफगाणिस्तानच्या भूभागात घुसून चौक्या व कुंपण उभारत असल्याचा आरोप अफगाणी नेत्यांनी केला होता. तालिबानच्या नेत्यांनी ड्युरंड सीमेबाबत उघडपणे भूमिका घेतलेली नाही.

पण पाकिस्तानच्या स्वातपासून बलोचिस्तानपर्यंतचा भूभाग हा पख्तूनीस्तान असल्याचा तालिबानचा दावा आहे. तसेच अडीच महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून तालिबानचे दहशतवादी सीमेवर तैनात पाकिस्तानच्या लष्कराला धमकावित असल्याचे व्हिडिओ समोर आले होते. ड्युरंड सीमा आपल्याला मान्य नसून पाकिस्तानच्या अटकपर्यंत अफगाणिस्तान असल्याची धमकी तालिबानच्या दहशतवाद्यांनी दिली होती. पाकिस्तानी माध्यमांनी तालिबानच्या या धमकीवर चिंता व्यक्त केली होती.

ड्युरंडअशा परिस्थितीत, पाकिस्तानने तालिबानच्या नेत्यांना ड्युरंड लाईनवरुन धमकावल्याची बातमी समोर येत आहे. सीमेवरील वाहतूक सुरू हवी असेल तर ड्युरंड लाईन मान्य करा, असे पाकिस्तानने तालिबानला बजावल्याचा दावा केला जातो. पाकिस्तानच्या या ब्लॅकमेलिंगवर चिडलेल्या तालिबानच्या राजवटीने देखील ड्युरंड सीमेबाबतच्या अटी स्वीकारणार नसल्याचे फटकारल्याचा दावा केला जातो.

पाकिस्तान सरकार किंवा तालिबानने या बातमीला दुजोरा दिलेला नाही. ड्युरंड सीमेची बातमी समोर येत असताना तालिबानचा प्रमुख अखुंदझदा याचा नवा इशाराही समोर आला आहे. तालिबानच्या वेगवेगळ्या गटांमध्ये घुसखोरांनी प्रवेश केला असून हे घुसखोर तालिबानसाठी धोकादायक ठरू शकतात, असा इशारा अखूंदझदा याने दिला. या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे, अन्यथा संबंधित गटांच्या प्रमुखांना त्याची किंमत मोजावी लागेल, अशी धमकी अखुंदझदा याने दिली.

leave a reply