दहशतवादी ‘स्मॉलपॉक्स व्हायरस’च्या सहाय्याने जैविक हल्ला चढवू शकतात

- उद्योजक बिल गेट्स यांचा इशारा

जैविक हल्ला, ‘स्मॉलपॉक्स व्हायरस’लंडन – दहशतवादी गट विमानतळांवर ‘स्मॉलपॉक्स व्हायरस’च्या सहाय्याने जैविक हल्ला चढवू शकतात, असा इशारा अमेरिकी उद्योजक बिल गेट्स यांनी दिला. अशा प्रकारचे जैविक दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी ‘जर्म गेम्स’ व ‘पॅन्डेमिक टास्क फोर्स’ प्रभावी ठरु शकतील, असा दावाही गेट्स यांनी केला. काही दिवसांपूर्वीच ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनीही, कट्टरपंथिय गटांकडून ‘बायो टेररिझम’चा धोका असल्याचे बजावले होते.

ब्रिटनमधील ‘पॉलिसी एक्सचेंज’ या अभ्यासगटाने आयोजित केलेल्या मुलाखतीत गेट्स यांनी नव्या हल्ल्याबाबत इशारा दिला. एखाद्या दहशतवादी गटाने स्मॉलपॉक्स व्हायरस (देवीच्या आजाराचा विषाणू) १० विमानतळांवर फैलावणारा हल्ला चढविला तर जग त्याला तोंड देण्यास तयार आहे का? असा सवाल करीत बिल गेट्स यांनी जैविक हल्ल्याच्या धोक्याकडे लक्ष वेधले. नव्या नैसर्गिक साथी व जैविक जैविक हल्ला, ‘स्मॉलपॉक्स व्हायरस’दहशतवादी हल्ल्यामुळे येणार्‍या साथी या सध्याच्या कोरोना साथीपेक्षा अधिक भयावह असू शकतात, असेही त्यांनी बजावले.

अशा साथी तसेच हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सज्जता ठेवायची असेल तर त्यासाठी ‘जर्म गेम्स’ व ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या माध्यमातून उभारण्यात आलेला ‘पॅन्डेमिक टास्क फोर्स’ हे प्रभावी पर्याय ठरतील, असा दावा अमेरिकी उद्योजकांनी केला. साथींचा मुकाबला करण्यासाठी ‘जर्म गेम्स’च्या माध्यमातून सराव करता येईल, असे बिल गेट्स म्हणाले. ‘जर्म गेम्स’ व टास्क फोर्स तयार करण्यासाठी संशोधन तसेच विकास क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करावी लागेल, असे गेट्स यांनी सांगितले. अमेरिका व ब्रिटनसारख्या देशांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला.

एप्रिल २०१८ मध्ये बिल गेट्स यांनी एका कार्यक्रमात, रोगाची नवी साथ सहा महिन्यात तीन कोटींहून अधिक बळी घेईल, असा इशारा दिला होता. हा इशारा देतानाच, जगातील सर्वच देश अशा साथीविरोधात तयारी करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेही बजावले होते. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेता गेट्स यांचा नवा इशारा लक्षवेधी ठरतो.

leave a reply