तालिबान अमेरिकेबरोबरील कराराचे उल्लंघन करीत आहे

- अफगाणिस्तानचे लष्करप्रमुख जनरल झिया

काबूल – अमेरिकेबरोबर झालेल्या करार तालिबान पाळत नसून तालिबानने अल-कायदाशी संबंध तोडलेले नाहीत. तालिबान अल कायदासह इतर दहशतवादी संघटनांशी संबंध राखून असल्याचा दावा अफगाणिस्तानचे लष्करप्रमुख जनरल यासिन झिया यांनी केला आहे. अफगाणिस्तानच्या सुरक्षादलांनी फराह प्रांतात नुकत्याच केलेल्या कारवाईत ‘अल कायदा’चे दहशतवादी ठार झाले होते. तसेच दोन आठवड्यांपूर्वी तालिबानी दहशतवाद्यांवर कारवाई करताना अल कायदाचा क्रमांक दोनचा नेता ‘अल- मिसरी’ ठार झाला होता. यापार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल यासिन झिया यांनी तालिबान शांती कराराच्या अटींचे पालन करीत नसल्याच्या ठपका ठेवून अमेरिकेला तालिबानच्या विश्वासघाताची जाणीव करून देत आहेत.

तालिबान अमेरिकेबरोबरील कराराचे उल्लंघन करीत आहे - अफगाणिस्तानचे लष्करप्रमुख जनरल झियागेल्या काही दिवसात अफगाणिस्तानमधल्या तालिबानचे वर्चस्व असलेल्या फराह प्रांतात अफगाणी सुरक्षादलांच्या कारवाईत ‘अल-कायदा’चेही दहशतवादी ठार झाल्याचे अफगाणिस्तानचे लष्करप्रमुख जनरल यासिन झिया यांनी म्हटले आहे. हा अफगाणिस्तानमध्ये ‘अल- कायदा’ सक्रीय असल्याचा आणि तालिबानबरोबर त्यांचे संबंध कायम असल्याचा पुरवा ठरतो, असे झिया म्हणाले. अफगाणिस्तानच्या फराह प्रांतावर तालिबानचे वर्चस्व होते. गेल्या काही महिन्यांपासून या प्रांतातील तालिबानचे हल्ले वाढले होते. या पार्श्वभूमीवर अफगाणी सुरक्षादलाने तालिबानविरोधात आक्रमक कारवाई हाती घेतली आहे.

तालिबानने अल-कायदासह पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांशी संबंध ठेवून अमेरिकेसोबतच्या शांतीकराराचे उल्लघंन करीत असल्याचे आरोप अफगाणी लष्करप्रमुखांनी केला आहे . फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेबरॊबर तालिबानचा शांती करार पार पडला होता. यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातून संपूर्ण सैन्य माघारीचा निर्णय घेतला होता. या करारानुसार तालिबानला सर्व दहशतवादी संघटनांबरोबर संबंध तोडण्याची अट घालण्यात आली होती. मात्र तसे होताना दिसत नसून तालिबान या कराराचे पालन करीत नसल्याचे अफगाणिस्तानचे म्हणणे आहे. तसेच तालिबान-अफगाणिस्तानमध्ये शांती करारालाही यामुळेच विलंब होत असल्याचे दावे केले जात आहेत.

अमेरिकेच्या सैन्य माघारीनंतर अफगाणिस्तान पुन्हा तालिबानच्या हातात जाईल, अशी भीतीही काही विश्लेषक व्यक्त करीत आहेत. तसेच अमेरिकेबरोबरील तालिबानचा शांती करार तडीस जावा यासाठी सध्या अल-कायदा गप्प असल्याचे दावेही करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनीही अमेरिकेची अफगाणिस्तानातील उपस्थिती आवश्यक असल्याचे म्हटले होते. यापार्श्वभूमीवर अफगाणिस्तानचे लष्करप्रमुख जनरल यासिन झिया यांच्या आरोपाचे महत्व वाढले आहे.

तालिबान अमेरिकेबरोबरील कराराचे उल्लंघन करीत आहे - अफगाणिस्तानचे लष्करप्रमुख जनरल झियादरम्यान, तालिबानने हा आरोप फेटाळला असून सध्याच्या घडीला अफगाणिस्तानमध्ये ‘अल- कायदा’ सक्रीय नसल्याचे तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद नईम यांनी म्हटले आहे. तालिबान ‘अल- कायदा’ किंवा इतर दहशतवादी संघटनांना अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दुसऱ्या देशाविरोधात करु देणार नाही, असे आश्वासन या प्रवक्त्याने दिले. पण अफगाणिस्तानमध्ये ‘अल-कायदा’सह पाकिस्तान स्थित इतरही दहशतवादी संघटना कार्यरत असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या अहवालातून म्हटले होते. अफगाणिस्तानमध्ये जवळपास सहा ते साडेसहा हजार पाकिस्तानी दहशतवादी सक्रीय असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने स्पष्ट केले होते. याचा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान दोन्ही देशांना धोका संभवत असल्याचा इशारा या अहवालातून देण्यात आला होता.

leave a reply