भारताकडून अफगाणिस्तानच्या हेरातमध्ये मुलींसाठी दोन शाळांची उभारणी

काबूल – अफगाणिस्तानच्या हेरातमध्ये भारताने मुलींसाठी दोन शाळा उभारल्या आहेत. गुरुवारी या दोन शाळांचा उद्‌घाटन सोहळा पार पडल्याची माहिती अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासाने दिली. या शाळांमध्ये सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांनींना शिक्षण घेता येईल. भारत सरकारच्या ‘हाय इम्पॅक्ट कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट’ (एचआयसीडीपी) अंतर्गत या दोन शाळा उभारण्यात आल्या आहेत.

भारताकडून अफगाणिस्तानच्या हेरातमध्ये मुलींसाठी दोन शाळांची उभारणी२००१ साली अफगाणिस्तानात लोकनियुक्त सरकार स्थापन झाल्यानंतर भारताने ‘एचआयसीडीपी’ उपक्रम हाती घेतला. या ‘एचआयसीडीपी’अंतर्गत भारताने आतापर्यंत अफगाणिस्तानात ५५० प्रकल्प उभारले आहेत. या शाळा त्या प्रकल्पांचाच भाग ठरतात. या शाळांसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले जाते.

दोन वर्षांपूर्वी अफगाणिस्तानच्या हेरातमधल्या संसद सदस्या नहिद फरिदा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाली. त्यावेळी हेरातमधल्या ६० टक्के मुली तबूंखाली आणि मोकळ्या आकाशात शिक्षण घेत असल्याचे त्यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले. तसेच भारताने शाळांच्या उभारणीसाठी सहकार्य करावे, अशी विनंती या संसद सदस्यांनी पंतप्रधानांकडे केली होती. तातडीने भारत सरकारने हेरातमध्ये मुलींच्या शाळांसाठी सहकार्य केल्याचे सांगून फरिदा यांनी भारताचे आभार मानले.

दरम्यान, अफगाणिस्तानातील संघर्षामुळे आणि तालिबानचा मुलींच्या शिक्षणाला विरोध असल्यामुळे या देशातल्या मुली शिक्षणापासून वंचित राहिल्या होत्या. मुलींच्या सुरक्षेसाठी आणि भितीपोटी पालक आपल्या मुलींना शाळेत पाठवत नव्हते. पण आता या देशातली परिस्थिती बदलत चालली आहे. मुली शिक्षणासाठी बाहेर पडत आहेत, ही समाधानाची बाब ठरते.

leave a reply