तुर्कीबरोबरच्या चर्चेत सिरियन भूमीचा अवैध ताबा सोडण्याचा मुद्दा असावा

- सिरियन राष्ट्राध्यक्षांची मागणी

सिरियन भूमीचा अवैध ताबादमास्कस – गेल्या काही वर्षांपासून सिरियाच्या उत्तरेकडील भागाचा ताबा घेणाऱ्या तुर्कीने इथून माघार घ्यावी. या मुद्यावर तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा होणार असेल तरच या चर्चेला काही अर्थ असेल, असे सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-अस्साद यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर तुर्कीच्या ताब्यात असलेल्या या भागातून सिरियात दहशतवाद पसरत असल्याचा आरोप अस्साद यांनी केला. सिरिया व तुर्कीतील वाद संपुष्टात आणण्यासाठी रशियाने केलेल्या मध्यस्थीचे सिरियन राष्ट्राध्यक्ष बशर अल-अस्साद यांनी स्वागत केले. याबाबत चर्चा करण्यासाठी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे विशेष सल्लागार अलेक्झांडर लॅव्हरेंटीव्ह यांनी गुरुवारी सिरियन राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. इराणनेदेखील तुर्की व सिरिया यांच्यात समेट घडवून आणण्याच्या रशियाच्या प्रयत्नांचे स्वागत केले आहे. मात्र यावर वाटाघाटी सुरू होण्याच्या आधी सिरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी तुर्कीकडे केलेली मागणी लक्ष वेधून घेणारी ठरते.

leave a reply