अणुशास्त्रज्ञ फखरीझादेह यांच्या हत्येप्रकरणी इराणने माजी उपसंरक्षणमंत्री अलीरेझा यांना फाशीची शिक्षा ठोठावली

अलीरेझातेहरान/लंडन – इराणने माजी उपसंरक्षणमंत्री अलीरेझा अकबरी यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. इराणचे विख्यात अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांच्या हत्येच्या कटात अलीरेझा यांचा सहभाग असल्याचा ठपका ठेवून इराणने त्यांना ही शिक्षा सुनावली आहे. अकबरी ब्रिटीश गुप्तचर यंत्रणेचे महत्त्वाचे एजंट होते, असा दावा इराणने केला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत फखरीझादेह यांच्या हत्येसाठी इस्रायल जबाबदार असल्याचे आरोप इराणकडून केले जात होते. पण आता अलीरेझा ब्रिटनचे हस्तक असून त्यांनी फखरीझादेह यांच्या हत्येच्या कटात सहभाग घेतल्याचा दावा करून इराणने नवी खळबळ माजविली आहे.

2020 साली इराणच्या अणुकार्यक्रमाचे आघाडीचे शास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांची तेहरान शहराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादने फखरीझादेह यांची कडक सुरक्षा व्यवस्था भेदून हत्या घडविल्याचा आरोप इराणने केला होता. याप्रकरणी मोसादच्या आठ ते दहा हेरांना ताब्यात घेतल्याचेही इराणने जाहीर केले होते. त्याचबरोबर फखरीझादेह यांच्या हत्येची योजना आखणाऱ्या मोसादच्या अधिकाऱ्यांवर सूड उगविण्याची धमकी इराणने दिली होती.

अलीरेझापण फखरीझादेह यांच्या हत्येमागे ब्रिटीश गुप्तचर यंत्रणेचा सहभाग असल्याचे सांगून इराणने नवी खळबळ उडविली आहे. यासाठी इराणचे माजी उपसंरक्षणमंत्री अलीरेझा अकबरी यांनी जाणीवपूर्वक माहिती पुरविल्याचा ठपका इराणच्या गुप्तचर यंत्रणेने ठेवला. 1997 ते 2005 या कालावधीत अलीरेझा इराणचे उपसंरक्षणमंत्री होते. त्याचबरोबर इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा काऊन्सिलचे प्रमुख अली शामखानी यांचे विश्वसनीय म्हणून अलीरेझा यांची ओळख होती. आपल्या या पदाचा गैरफायदा घेऊन अलीरेझा यांनी ब्रिटीश गुप्तचर यंत्रणेला फखरीझादेह यांची माहिती पुरविल्याचे इराणने म्हटले आहे.

इराण तसेच ब्रिटन असे दुहेरी नागरिकत्व असलेले अलीरेझा अकबरी हे ब्रिटीश गुप्तचर यंत्रणेचे महत्त्वाचे एजंट होते, असा ठपका इराणच्या गुप्तचर यंत्रणेने ठेवला. या जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी आणि इराणच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा आरोप निश्चित करून इराणने अलीरेझा यांना फाशीची शिक्षा सुनावली. याबाबतचा व्हिडिओ इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केला. इराणने अलीरेझा यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा ब्रिटनने निषेध केला आहे. इराण राजकीय सूडापोटी ब्रिटनच्या नागरिकावर कारवाई करीत असल्याची टीका करून ब्रिटनने अलीरेझा यांच्या सुटकेची मागणी केली.

पण गेल्या दोन वर्षात इराणने फखरीझादेह यांच्या हत्येबाबत वेगवेगळी कारणे दिल्याचे आखातातील वृत्तसंस्था लक्षात आणून देत आहेत. सुरुवातीच्या काळात इराणने फखरीझादेह यांच्या हत्येसाठी इस्रायलला जबाबदार धरले होते. इस्रायलने एआयवर आधारीत मशिनगनचा वापर करून फखरीझादेह यांची हत्या घडविल्याचा दावा इराणने केला होता. पण वर्षभरापूर्वी इराणने फखरीझादेह यांच्या हत्येमागे आपल्याच देशातील सुरक्षा यंत्रणेतील काही भ्रष्ट अधिकारी असल्याचा आरोप केला होता. तर दोन दिवसांपूर्वी इराणने माजी उपसंरक्षणमंत्री अलीरेझा यांना याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली. यामुळे परदेशी गुप्तचर यंत्रणांनी इराणची सुरक्षा यंत्रणा पोखरल्या आहेत, याकडे आखाती वृत्तसंस्था लक्ष वेधत आहेत.

leave a reply