अफगाणिस्तानातील रक्तपाताचे पडसाद पाकिस्तानात उमटू लागले पाकिस्तानी लष्करावर ‘तेहरिक’चा हल्ला

- अधिकार्‍यासह 11 जवान ठार झाल्याचे वृत्त

स्लामाबाद – अफगाणिस्तानातील अमेरिकेची सैन्यमाघार म्हणजे तालिबानचा विजय ठरतो, असे सांगून त्याचा आनंद साजरा करणार्‍या पाकिस्तानला याचा पहिला धक्का बसला. खैबर-पख्तूनख्वा प्रांतात ‘तेहरिक-ए-तालिबान’ने पाकिस्तानी लष्करावर हल्ला चढवून एका अधिकार्‍यासह 11 जवानांना ठार केले. तसेच या दहशतवादी संघटनेने काही जवानांचे अपहरण केल्याच्या बातम्या येत आहेत. पाकिस्तानच्या यंत्रणांनी ही बातमी दडपण्याचा शक्य तितका प्रयत्न करून पाहिला. मात्र सोशल मीडिया व भारतीय माध्यमांनी याच्या बातम्या दिल्यानंतर, आपले दोन जवान या हल्ल्यात ठार झाल्याचे पाकिस्तानच्या लष्कराने जाहीर केले.

अफगाणिस्तानातील रक्तपाताचे पडसाद पाकिस्तानात उमटू लागले पाकिस्तानी लष्करावर ‘तेहरिक’चा हल्ला - अधिकार्‍यासह 11 जवान ठार झाल्याचे वृत्ततालिबानकडे अफगाणिस्तानच्या सुमारे 80 टक्क्याहून अधिक भूमीचा ताबा आला असून लवकरच तालिबान अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत करील, असे दावे केले जातात. पाकिस्तानचे कट्टरपंथिय तालिबानच्या विजयाचा जल्लोष करीत आहे. पाकिस्तानचे सरकार व लष्कर उघडपणे याबाबत तटस्थ भूमिका स्वीकारीत असले, तरी तालिबानला पाकिस्तानकडून सर्वतोपरी सहकार्य मिळत असल्याची बाब लपून राहिलेली नाही. मात्र तालिबान अफगाणिस्तानच्या ताब्यात गेल्यानंतर, पाकिस्तानची अवस्था भयंकर बनेल, असा इशारा या देशातले जबाबदार विश्‍लेषक व पत्रकार देत आहेत. त्यांचे इशारे प्रत्यक्षात उतरत असल्याचे दाखवून देणारा घातपात ‘तेहरिक-ए-तालिबान’ने घडविला.

तेहरिकने खैबर-पख्तुनख्वाच्या खुर्रम भागात हल्ला चढवून पाकिस्तानी लष्कराच्या 11 जणांना ठार केले. इतकेच नाही तर तेहरिकच्या दहशतवाद्यांनी काही जवानांचे अपहरण केल्याचे वृत्त आहे. ठार झालेल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या कॅप्टन अब्दुल बसित यांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानने तालिबानला सहाय्य केले आणि अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली, तर पाकिस्तानातील तालिबान असलेल्या ‘तेहरिक’ला फार मोठे बळ मिळेल, अशी चिंता पाकिस्तानातील काही विश्‍लेषकांनी व्यक्त केली होती. हा धोका पत्करूनही पाकिस्तान अफगाणिस्तानचा ताबा मिळविण्यासाठी तालिबानला सहाय्य करीत आहे.

अफगाणिस्तानातील तालिबान व पाकिस्तानातील तालिबान दोन नसून त्या समान विचारसरणीवर आधारलेल्या संघटना आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानातल्या तालिबानला मिळालेले यश पाकिस्तानातल्या ‘तेहरिक’ला उत्तेजन देईल आणि यानंतर पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यांचे भयंकर सत्र सुरू होईल, अशी चिंता हे विश्‍लेषक व्यक्त करीत होते. तालिबानच्या प्रवक्त्याने देखील ‘तेहरिक’ व पाकिस्तानमधील संघर्ष हा पाकिस्तानचा अंतर्गत मामला ठरतो, असे सांगून याच्याशी आपला संबंध नसल्याचे म्हटले आहे.

leave a reply