आंतरराष्ट्रीय समुदायाचा अमेरिकी डॉलरकडे असणारा कल कमी झाला

- रशियाच्या मध्यवर्ती बँकेचा दावा

अमेरिकी डॉलरमॉस्को – रशियासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा अमेरिकी डॉलरचा वापर करण्याकडे असणारा कल कमी झाला असून युरोसारख्या चलनांना प्राधान्य दिले जात आहे, असे ‘बँक ऑफ रशिया’च्या गव्हर्नर एल्विरा नबिउलिना यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापारात आता इतर चलनांचा वापर वाढत असल्याचा दावाही गव्हर्नर एल्विरा नबिउलिना यांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वीच रशियाने आपल्या ‘नॅशनल वेल्थ फंड’मधील अमेरिकी डॉलरचा हिस्सा शून्यावर आणल्याचे जाहीर केले होते.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी काही वर्षांपूर्वी ‘डी-डॉलरायझेशन’ची प्रक्रिया सुरू केली होती. अमेरिकी डॉलरचा वापर कमी करण्यासाठी त्यांनी आक्रमक पावले उचलली आहेत. रशियाच्या इंधन कंपन्या आपल्या प्रमुख भागीदार देशांबरोबर रुबल व इतर स्थानिक चलनात व्यवहार करीत आहेत. यात चीन, युरोपिय देश तसेच इराणसारख्या देशांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी रशियाच्या परकीय गंगाजळीतील अमेरिकी डॉलरचा हिस्सा कमी करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, रशियाच्या मध्यवर्ती बँकेने अब्जावधी डॉलर्स कमी करून त्याचे प्रमाण १० टक्क्यांच्याही खाली आणले आहे. चीन, इराणसारख्या देशांबरोबर स्थानिक चलनांमध्ये व्यापार व व्यवहार करण्यावर भर देण्यात येत असून मध्यवर्ती बँकांमध्ये करारही करण्यात आले आहेत. पुतिन यांच्या ‘डी-डॉलरायझेशन’च्या मोहिमेला चीनने साथ दिली असून दोन देशांमधील बहुतांश व्यवहार रुबल व युआनमध्ये सुरू झाल्याचे सांगण्यात येते.

या पार्श्‍वभूमीवर, रशियन मध्यवर्ती बँकेच्या प्रमुखांनी केलेले भाकित लक्ष वेधून घेणारे ठरते. ‘आम्ही फक्त नॅशनल वेल्थ फंडमधूनच नाही तर परकीय गंगाजळीतूनही डॉलरचा हिस्सा कमी केला आहे. जगातील अनेक देशांमधील परकीय गंगाजळींमध्ये आता अमेरिकी डॉलरचे प्रमाण घटण्यास सुरुवात झाली आहे. अनेक देशांनी स्थानिक चलनाचा वापर सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. व्यापारासाठी युरोवर भर देण्याच्या हालचालीही सुरू आहेत’, असे ‘बँक ऑफ रशिया’च्या गव्हर्नर एल्विरा नबिउलिना म्हणाल्या.

अर्थात हे सर्व झटपट घडणार नाही, तर त्यासाठी काही वर्षे अजून जावी लागतील, असे भाकित त्यांनी केले. जगातील यापूर्वीचे राखीव चलन असणार्‍या ब्रिटीश पौंडाचे स्थान कमी होण्यास अनेक वर्षे लागली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. रशिया व प्रमुख व्यापारी भागीदार असणार्‍या चीनमधील अमेरिकी डॉलरचा वापर ५० टक्क्यांखाली घसरला आहे. त्याचवेळी दोन देशांमधील युआन चलनाचा वापर १७ टक्क्यांवर गेला आहे. गेल्याच महिन्यात चीनचे सरकारी मुखपत्र असणार्‍या ‘ग्लोबल टाईम्स’ने अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया ‘डी-डॉलरायझेशन’ला बळ देणारी ठरेल, असा दावाही केला होता.

leave a reply