अमेरिका, चीनच्या गस्ती विमानांमुळे तैवानच्या आखातातील तणाव वाढला

- चीनचा अमेरिकेवर चिथावणीचा आरोप

तैपेई – चीनची ३८ विमाने आणि ६ विनाशिकांनी तैवानच्या हद्दीजवळ गस्त घातली. यामध्ये चीनच्या जम्बो बॉम्बर ड्रोनचा समावेश होता. क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या या ड्रोनने आपल्या देशाला घिरट्या घातल्याचा आरोप तैवानचे लष्कर करीत आहे. चीनच्या या गस्तीमुळे तणाव निर्माण झालेला असताना अमेरिकेच्या ‘पी-८ए पोसायडन’ या अवजड गस्ती जहाजाने तैवानच्या आखातातून प्रवास केला. चीनने यावर आक्षेप नोंदविला असून अमेरिकन विमानाची गस्ती चिथावणी देणारी ठरते, असा इशारा दिला. दरम्यान, अमेरिका व चीनच्या या गस्तीमुळे या क्षेत्रातील तणाव वाढल्याचा दावा केला जातो.

गेल्या महिन्यात चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने तैवानच्या आखातात आत्तापर्यंतचा सर्वात मोठ्या युद्धसरावाचे आयोजन केले होते. सलग तीन दिवस चाललेल्या या युद्धसरावात चीनची लढाऊ विमाने, विनाशिकांनी तैवानच्या ‘मीडियन लाईन’ची मर्यादा ओलांडली होती. चीनच्या या युद्धसरावावर अमेरिका व मित्रदेशांनी टीका केली होती. पण याची अजिबात पर्वा न करणाऱ्या चीनने गुरुवारी पुन्हा तैवानच्या हवाई व सागरी सुरक्षेला आव्हान दिले.

चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीची ३८ लढाऊ तसेच बॉम्बर विमाने आणि ६ विनाशिकांनी तैवानच्या आखाताजवळून प्रवास केला. यातील काही विमानांनी तैवानला घिरट्या घातल्या. चीनच्या या हवाई गस्तीमध्ये पहिल्यांदाच ‘टीबी-००१’ या बॉम्बर ड्रोनचा देखील समावेश होता. या ड्रोनने तैवान व फिलिपाईन्सला वेगळी करणारी बाशीची खाडी ओलांडून गस्त घातली. तैवानची गस्त पूर्ण केल्यानंतर सदर बॉम्बर ड्रोन चीनसाठी रवाना झाले.

‘टीबी-००१’ हा चीनने तैवानविरोधात आखलेल्या लष्करी धोरणाचा सर्वात मोठा भाग मानला जातो. येत्या काळात चीनन तैवानवर हल्ला चढविलाच तर पिपल्स लिबरेशन आर्मी टीबी-००१ चा वापर करुन तैवानच्या प्रमुख शहरांना लक्ष्य करू शकतात. तैवानने आपल्या राखीव लष्करासाठी तयार केलेल्या ठिकाणांना सदर ड्रोन लक्ष्य करील, असा दावा तैवानस्थित ‘नॅशनल पॉलिसी फाऊंडेशन’ या अभ्यासगटाचे विश्लेषक चिह चूंग यांनी केला.

याआधीही चीनच्या ड्रोन्सनी तैवानला घिरट्या घातल्या होत्या. त्याचबरोबर अण्वस्त्रांनी सज्ज असलेल्या एच-६ या बॉम्बर विमानानेही तैवानला फेरी मारली होती. पण क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या टीबी-००१ या मोठ्या ड्रोन्सची गस्त तैवानच्याही चिंता वाढविणारी ठरत आहे. सदर ड्रोन १२०० किलो वजनाची लेझर गायडेड बॉम्ब, एफटी-७ ग्लाईड, एफटी-९ गायडेड बॉम्बस तर हवेतून जमिनीवर मारा करणारे एआर-४ आणि एआर-३ क्रूझ्‌‍ क्षेपणास्त्र देखील वाहून नेण्याची क्षमता आहे.

अमेरिकेच्या नौदलाने शुक्रवारी पी-८ए पोसायडन हे पाणबुडीविरोधी गस्ती विमान रवाना करुन चीनला प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर येत्या मे महिन्यात अमेरिकेच्या संरक्षण साहित्याची निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी तैवानचा दौरा करणार आहे. तैवान हा चीनचा अविभाज्य सार्वभौम भूभाग असल्याचे सांगून चीनने अमेरिकेच्या राजकीय तसेच लष्करी अधिकाऱ्यांची तैवान भेट ‘वन चायना पॉलिसी’चे उल्लंघन असल्याचा आरोप केला होता. तसेच सदर कंपन्यांवर निर्बंधही लादले होते. पण चीनच्या या निर्बंधांची पर्वा न करता अमेरिकन कंपन्यांचे अधिकारी तैवानमध्ये दाखल होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यामुळे चीन खवळला असून अमेरिका या क्षेत्रातील तणाव वाढविण्याचे काम करीत असल्याचा आरोप चीन करीत आहे.

leave a reply