इराणने ओमानच्या आखातातून ऑईल टँकरचा ताबा घेतला

- जहाजात २४ भारतीय कर्मचाऱ्यांचा समावेश

दुबई – इराणने मार्शल आयलँड्सचा फ्लॅग असलेला ऑईल टँकरचा ताबा घेतला आहे. सदर जहाजाने आमच्या गस्तीजहाजाला धडक दिल्यामुळे ही कारवाई केल्याचे इराणच्या नौदलाने म्हटले आहे. अमेरिकेच्या ह्यूस्टनसाठी निघालेल्या सदर ऑईल टँकरवर २४ भारतीय कर्मचारी होते. तर इराणच्या नौदलाने ओमानच्या आखातात अर्थात आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत कारवाई केल्याचा आरोप अमेरिकन नौदल करीत आहे.

आंतरराष्ट्रीय इंधननिर्मिती कंपनी ‘शेवरॉन’साठी इंधनाची वाहतूक करणारे ‘ॲडव्हान्टेज स्वीट’ ऑईल टँकर गुरुवारी ओमानच्या आखातातून प्रवास करीत होते. अमेरिकेच्या ह्युस्टन बंदरासाठी हे जहाज रवाना होणार होते. पण त्याआधीच इराणच्या नौदलाने सदर जहाजावर कारवाई केली. पर्शियन आखातात गस्तीवर असणाऱ्या इराणच्या गस्तीजहाजाला संशयित टँकरने धडक दिली. यामुळे आमचे काही जवान बेपत्ता झाले तर काही जखमी झाल्याची माहिती इराणच्या नौदलाने दिली.

नेमक्या कोणत्या टँकरने गस्तीजहाजांना धडक दिली, याचे उत्तर इराणच्या नौदलाने दिलेले नाही. पण जहाजांच्या वाहतूकीवर नजर ठेवणाऱ्या ट्रॅकरच्या माहितीनुसार मार्शल आयलँड्सचा फ्लॅग असलेल्या जहाजानेच ही धडक दिल्याचा आरोप करुन इराणच्या नौदलाने सदर जहाज ताब्यात घेतले. यावेळी इराणच्या नौदलाने सदर जहाजाच्या दिशेने गोळ्या झाडल्याचाही आरोप होत आहे. अमेरिका व युरोपिय देशांनी इराणच्या या कारवाईवर जोरदार टीका केली.

दरम्यान, गेल्या दोन वर्षात इराणने सदर सागरी क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या पाच व्यापारी जहाजांवर बेकायदेशीररित्या कारवाई केल्याचा आरोप पाश्चिमात्य देश करीत आहेत. अमेरिकन सिनेटर्सनी इराणवर तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर निर्बंधांची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

leave a reply