अफगाणिस्तानातले दहशतवादी पाकिस्तानातील ‘सुरक्षित स्वर्गाचा’ लाभ घेत आहेत

- अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनचा ठपका

वॉशिंग्टन – पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या सुरक्षित स्वर्गांमुळे अफगाणिस्तानातील असुरक्षितता आणि अस्थैर्य वाढत आहे. कारण दहशतवादी याचा लाभ घेत आहेत, असा खणखणीत इशारा अमेरिकेने दिला. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनचे माध्यम सचिव जॉन कर्बी यांनी यासंदर्भात अमेरिका सातत्याने पाकिस्तानशी चर्चा करीत असल्याची माहिती दिली. अफगाणिस्तानातील परिस्थितीला पाकिस्तानचे दहशतवादी धोरण जबाबदार असल्याचे सूचक शब्दात सांगणार्‍या कर्बी यांनी भारत मात्र अफगाणिस्तानच्या स्थैर्य व विकासासाठी विधायक भूमिका पार पाडत असल्याचे म्हटले आहे.

अफगाणिस्तानातले दहशतवादी पाकिस्तानातील ‘सुरक्षित स्वर्गाचा’ लाभ घेत आहेत - अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनचा ठपकाअमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी यासंदर्भात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती कर्बी यांनी दिली. अफगाणिस्तानच्या सीमेनजिक असलेल्या पाकिस्तानच्या भागात दहशतवाद्यांचे सुरक्षित स्वर्ग आहेत. याचा वापर तालिबानचे दहशतवादी अफगाणिस्तानात असुरक्षितता व अस्थैर्य माजविण्यासाठी करतात, असा ठपका कर्बी यांनी ठेवला. अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी यासंदर्भातील आंतरराष्ट्रीय समुदायाच्या चिंता पाकिस्तानसमोर मांडल्याचे संकेत कर्बी यांनी दिले आहेत. हे सुरक्षित स्वर्ग बंद करण्याचा इशारा अमेरिकेने पाकिस्तानला दिल्याचे संकेत देऊन कर्बी यांनी अमेरिकेने पाकिस्तानवरील दडपण प्रचंड प्रमाणात वाढविले आहे.

पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ व आयएसआयचे प्रमुख फैज हमीद अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता खरा. पण याचे अगदी उलटे परिणाम झाल्याचा आरोप पाकिस्तानची माध्यमे करीत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सत्तेवर आल्यानंतर जवळपास सर्वच प्रमुख देशांच्या नेत्यांशी चर्चा केली. पण या यादीत पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान?खान यांचा समावेश नाही. म्हणूनच बायडेन यांचा फोन हा पाकिस्तानच्या पंतप्रधानांसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला असून यावरून विरोधक इम्रान?खान यांची खिल्ली उडवित आहेत. मात्र बायडेन यांनी इम्रान?खान यांना फोन केला नाही, तर पाकिस्तानसमोर दुसरेही पर्याय आहेत, असे दावे मोईद युसूफ यांनी केले. पण हे दुसरे पर्याय कोणते, अशी विचारणा केल्यानंतर फोनकॉलच्या ऐवजी संपर्काच्या दुसर्‍या माध्यमांचा हास्यास्पद उल्लेख मोईद युसूफ यांनी केला.

मात्र अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना न केलेला फोन म्हणजे हसण्यावारी नेण्यासारखी गोष्ट नाही, असा इशारा पाकिस्तानचे जबाबदार विश्‍लेषक देत आहेत. अफगाणिस्तानात तालिबान घडवित असलेल्या हिंसाचाराला पाकिस्तानच कारणीभूत आहे, असे अमेरिकेला वाटत आहे. या प्रश्‍नावर अमेरिका पाकिस्तानवर निर्बंध लादू शकेल, अशी चिंता हे विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. पेंटॅगॉनचे माध्यम सचिव कर्बी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत त्याचेच संकेत दिले आहेत.

अफगाणिस्तानातील असुरक्षितता व अस्थैर्य यामागे पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे सुरक्षित स्वर्ग आहेत आणि याबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाच्या चिंता वाढल्या आहेत, हे लक्षात आणून देऊन कर्बी यांनी पाकिस्तानची कोंडी केली आहे. यामुळे अफगाणिस्तानात तालिबानला मिळत असलेल्या लष्करी आघाडीचे स्वागत करणार्‍या पाकिस्तानला धडकी भरू शकते. पाकिस्तानच्या सरकारने अफगाणिस्तान व तालिबानबाबतचे आपले धोरण एकदाचे स्पष्ट करावे, अशी मागणी पाकिस्तानचे लोकप्रतिनिधी करू लागले आहेत. एकीकडे अफगाणिस्तानच्या गनी सरकारला पाकिस्तानने मान्यता दिली आहे आणि दुसर्‍या बाजूला पाकिस्तान तालिबानला सहाय्य पुरवित आहे, हा दुटप्पीपणा ठरतो. यावरून अमेरिका कुठल्याही क्षणी पाकिस्तानला लक्ष्य करू शकेल. अमेरिकेच्या कारवाईमध्ये आर्थिक निर्बंधांपासून ते तालिबानवरील हल्ल्यांपर्यंतच्या कुठल्याही गोष्टीचा समावेश असू शकतो, असे विश्‍लेषक सांगत आहेत.

कर्बी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानवर गंभीर आरोप करीत असताना, भारताच्या अफगाणिस्तानातील विधायक भूमिकेचे स्वागत केले. हा पाकिस्तानसाठी फार मोठा धक्का ठरतो. अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी युद्धासाठी पाकिस्तानने फार मोठी हानी सहन केली. तरीही अफागाणिस्तानच्या मुद्यावर अमेरिका व आंतरराष्ट्रीय समुदाय भारतालाच अधिक महत्त्व देत असल्याची खंत पाकिस्तानकडून व्यक्त केली जाते. त्या पार्श्‍वभूमीवर कर्बी यांनी भारताची प्रशंसा करून पाकिस्तानला अधिकच अस्वस्थ केल्याचे दिसत आहे.

मझार-ए-शरीफमधून भारतीय मायदेशी परतणार

अफगाणिस्तानात तालिबानचा धोका वाढलेला असताना, भारताने ‘मझार-ए-शरीफ’मधील आपल्या आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांना मायदेशी आणण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष विमानाद्वारे भारतीय अधिकारी व कर्मचार्‍यांना मायदेशी आणले जाणार असल्याची माहिती अफागणिस्तानातील भारतीय उच्चायुक्तालयाने दिली. अफगाणिस्तान असलेल्या भारतीय नागरिकांना हा देश सोडायचा असल्यास त्यांनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन देखील उच्चायुक्तालयाने केले होते.

मझार-ए-शरीफ ताब्यात घेण्यासाठी तालिबानने हल्ला चढविला होता. हे शहर आपल्या ताब्यात आल्याचे दावेही तालिबानने केले होते. पण अफगाणी लष्कर हे शहर वाचविण्यासाठी झुंजत आहे. अशा परिस्थितीत इथल्या भारतीय आयुक्तालयाला असलेला धोका वाढला होता. गेल्याच महिन्यात या भागातील आपल्या आयुक्तलयातील सर्वच कर्मचार्‍यांना मायदेशी बोलावण्याचा निर्णय अमेरिका व तुर्कीने घेतला होता. तर परिस्थितीचा अंदाज घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे भारताच्या अफगाणिस्तानातील उच्चायुक्तालयाने म्हटले होते.

 

leave a reply