भारताने सागरी सुरक्षेवर आयोजित केलेल्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत अमेरिका व चीनमध्ये खडाजंगी

नवी दिल्ली – भारताच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सुरक्षा परिषदेच्या सागरी सुरक्षेवरील बैठकीत अमेरिका आणि चीनची चांगलीच जुंपली. सागरी क्षेत्रात कुठल्याही देशाची अरेरावी व धमकावणी खपवून घेत येणार नाही, असे सांगून अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी थेट साऊथ चायना सी क्षेत्रातील समस्येचा उल्लेख केला. तसेच सागरी सुरक्षेवर चर्चा आयोजित केल्याबद्दल अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताचे आभार मानले. यामुळे संतापलेल्या चीनने अमेरिकेचा हस्तक्षेप हीच साऊथ चायना सी क्षेत्राची खरी समस्या असल्याची टीका केली.

भारताने सागरी सुरक्षेवर आयोजित केलेल्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत अमेरिका व चीनमध्ये खडाजंगीऑगस्ट महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. या काळात दहशतवाद व सागरी सुरक्षा या मुद्यांना सर्वाधिक महत्त्व दिले जाईल, असे भारताने जाहीर केले होते. भारताच्या या दाव्यामुळे जागतिक दहशतवादाचे केंद्र असलेला पाकिस्तान व सागरी सुरक्षेसाठी धोकादायक बनलेला चीन, यांच्या चिंता वाढल्या होत्या. याआधी चीनने सागरी सुरक्षेच्या मुद्यावर सुरक्षा परिषदेत चर्चा होऊ दिली नव्हती. मात्र भारताने यावेळी आयोजित केलेल्या चर्चेला चीन विरोध करू शकला नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेत सागरी सुरक्षा व स्थैर्य यांना सर्वाधिक महत्त्व असल्याची जाणीव करून दिली. तसेच भारत हा इंडो-पॅसिफिक क्षेत्रात संपूर्ण सुरक्षा पुरविणारा देश असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ठासून सांगितले.

या बैठकीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन सहभागी होते. तर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी या बैठकीत चीनवर हल्ला चढविला. सागरी क्षेत्रात कुठल्याही देशाची अरेरावी व धमकावण्या सहन केल्या जाणार नाहीत. साऊथ चायना सी क्षेत्रातील देशांना अशा धमक्या मिळत आहेत आणि या क्षेत्रावर बेकायदेशीररित्या अधिकार गाजविण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र या क्षेत्रातील संघर्षाचे भयंकर आंतरराष्ट्रीय परिणाम संभवतात. सुरक्षा व व्यापारासाठी ही बाब घातक ठरेल, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन पुढे म्हणाले. ‘म्हणूनच सागरी सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन भारताने या विषयावर सुरक्षा परिषदेची बैठक आयोजित केली, यासाठी आम्ही भारताचे आभारी आहोत’, असे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन म्हणाले. साऊथ चायना सी क्षेत्र आपल्याच मालकीचे असल्याचा दावा करणार्‍या चीनला अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिलेला हा धक्का सहन झाला नाही. या बैठकीत उपस्थित असलेले चीनचे उपराजदूत दाई बिंग यांनी यावरील आपल्या देशाची नाराजी व्यक्त केली.

सुरक्षा परिषदेची ही बैठक हे काही साऊथ चायना सीचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी योग्य ठिकाण ठरत नाही. चीन व असियानचे सदस्यदेश मिळून ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या क्षेत्रात वाहतुकीचे स्वातंत्र्य अबाधित आहे व इथले स्थैर्य देखील कायम आहे. अमेरिकेचा हस्तक्षेप हीच या क्षेत्राची समस्या आहे. अमेरिका आपल्या युद्धनौका घुसवून या क्षेत्रात अस्थैर्य माजवित असल्याचा आरोप चीनच्या उपराजदूतांनी केला.

leave a reply