चीनचे लष्कर गलवान व्हॅलीतून मागे सरकले

नवी दिल्ली – भारताने स्वीकारलेल्या लष्करी, राजनैतिक आणि आर्थिक आघाड्यांवरील आक्रमक भूमिकेमुळे अस्वस्थ झालेल्या चीनचे लष्कर गलवान व्हॅलीतून मागे सरकले आहे. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींमध्ये पार पडलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, चीनचे लष्कर या भागातून मागे सरकल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तर, गलवानमधील चीनच्या हालचालींवर आपली बारीक नजर असल्याचे सांगून भारतीय लष्कराने या आघाडीवर धोका पत्करता येणार नाही, असे संकेत दिले आहेत. म्हणूनच लष्कराने गलवानमधील आपल्या सैनिकांसाठी उणे तापमानात आवश्यक असणाऱ्या विशेष साहित्यांच्या खरेदीसाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.Chinese army retreated through the Galwan Valley

गलवान व्हॅलीतील संघर्षात चिनी लष्कराची खोड मोडून व चीनच्या तोडीस तोड सैन्यतैनाती करून भारताने चीनला आपली धमक दाखवून दिली. तर भारत सरकारने चीनच्या विरोधात आर्थिक आघाडीवर चीनला दणके देणारे निर्णय घेतले आणि  जनतेनेही सरकारला पूर्ण पाठिंबा देऊन चीनला हादरा दिला. त्याचवेळी अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपान, फ्रान्स, जर्मनी या देशांनी भारताला समर्थन देऊन चीनच्या विरोधात मोठी राजकीय आघाडी उघडली. या सर्व घडामोडी घडत असताना, दोन दिवसांपूर्वी भारताच्या पंतप्रधानांनी लेह येथील आपल्या जवानांची भेट घेऊन चीनच्या ‘विस्तारावादी’ धोरणाचा साऱ्या जगाला धोका असल्याचा संदेश दिला होता. या आघाड्यांवर धक्के बसू लागल्यानंतर बेचैनी वाढलेला चीन दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करू लागला आहे. या पार्श्वभूमीवर, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्यात विशेष चर्चा पार पडली.

या पार्श्वभूमीवर, गलवान व्हॅलीतून  चीनचे लष्कर साधारण एक ते दीड किलोमीटर मागे सरकल्याचा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. त्याचबरोबर पँगॉन्ग त्सो भागातील फिंगर-४ येथील तंबूही चीनच्या लष्कराने गुंडाळले आहेत. गलवान, हॉटस्प्रिंग आणि गोगरा या भागात तैनात असलेल्या चिनी लष्कराची वाहने मागे फिरलाची माहिती चीनचे लष्करच देत आहे. भारत सरकारच्या सूत्रांनी चीनच्या या लष्करी हालचालींची दखल घेतल्याचे म्हटले आहे. मात्र, चीनचे लष्कर सदर भागातून मागे फिरल्याची पूर्ण खातरजमा झाल्यानंतरच याबाबत निश्चित असे सांगता येईल, असे सूत्रांनी म्हटले आहे. सीमावादावर चीनकडून होणाऱ्या फसवणुकीचा अनुभव असल्यामुळे भारतीय लष्कराने लडाखमधील आपल्या तैनातीत कुठल्याही प्रकारची ढिलाई दाखविलेली नाही. लडाखमधील तापमान हळूहळू घसरत चालले असून अशा परिस्थितीत, आपल्या जवानांना  लष्करी साहित्याबरोबर इतर संसाधनांचाही पुरवठा करण्यासाठी लष्कराने हालचाली वाढविल्या आहेत.

सर्वच आघाड्यांवर कोंडी झालेला चीन या क्षणी गलवानमधून माघार घेत असला तरी, चीनच्या विस्तारवादी कारवायांचा धोका संपलेला नाही. वेगवेगळ्या मार्गाने चीन भारतीय सीमेत घुसखोरी करीतच राहील, असे सामरिक विश्लेषकांचे म्हणणे आहे. म्हणूनच भारताने आपली आक्रमक भूमिका सोडून चीनला कुठल्याही आघाडीवर शिरकाव करण्याची संधी देता कामा नये. या आघाडीवर भारताने व्यापक धोरण आखायला हवे अशी मागणी सदर सामरिक विश्लेषकांकडून केली जात आहे.

leave a reply