भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सात लाखांवर

- देशभरात एक कोटीहून अधिक कोरोना चाचण्या

नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या बळींची संख्या २० हजारांच्या पुढे गेली असून रुग्णांची संख्या सात लाखांच्या पुढे पोहोचली आहे. देशभरात कोरोनाच्या चाचण्यांमध्ये केलेल्या वाढीमुळे दिवसभरात २४ हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. आतापर्यंत देशात घेण्यात आलेल्या कोरोनाच्या चाचण्यांची संख्या एक कोटीच्यावर पोहोचली आहे. रविवारच्या एका दिवसात ३,४६,४५९ चाचण्या घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. एक कोटी चाचण्यांनंतर देशात ६ लाख ९७ हजार जण पॉझिटिव्ह आढळले. यानुसार भारतातील कोविड पॉझिटिव्ह रेट ६.७३ असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

India-Coronaदेशात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ७ लाख १५ हजारांच्या पुढे गेली आहे. रविवारी चोवीस तासात देशात २४,२४८ रुग्ण आढळले होते. त्यामुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ६,९७,४१३ वर पोहोचली होती. सोमवारी रात्रीपर्यंत देशात १७ हजारांहून अधिक रुग्ण आढळल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे देशात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ७ लाख १५ हजारांवर गेली आहे.

महाराष्ट्रात दिवसभरात २०४ जण दगावले. ५,३८६ नव्या रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यात या साथीने दगावलेल्यांची संख्या नऊ हजारांच्या पुढे गेली असून कोरोना बाधितांची संख्या २ लाख ६ हजारांवर पोहोचली आहे. मुंबईत ३९ जण दिवसभरात दगावले, तसेच १२०० नवे रुग्ण आढळले. मुंबईतील या साथीच्या बळींची संख्या पाच हजारांजवळ पोहोचली आहे.

तामिळनाडूत चोवीस तासात ६१ जणांचा बळी गेला असून ३,८२७ नव्या रुग्णांची नोंद झाली. दिल्लीत १३७९ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे दिल्लीतील या साथीची रुग्णसंख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे.

leave a reply