दक्षिण कोरियावर अणुयुद्धाचे काळे ढग दाटले आहेत

उत्तर कोरियाची धमकी

us nuclear B52 bomberसेऊल – अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संरक्षणदलांचा संयुक्त युद्धसराव नुकताच पार पडला. यामध्ये अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकबरोबरच अण्वस्त्रवाहू बॉम्बर विमानानेही सहभाग घेतला होता. यामुळे खवळलेल्या उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाला धमकावले. ‘उत्तर कोरियाला लक्ष्य करणाऱ्या युद्धसरावामुळे या क्षेत्रातील तणाव विकोपाला गेला असून दक्षिण कोरियावर अणुयुद्धाचे काळे ढग दाटले आहेत’, अशी धमकी उत्तर कोरियाने दिली.

अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संरक्षणदलातील आणखी एक युद्धसराव बुधवारी संपन्न झाला. यामध्ये अमेरिकेच्या ‘बी-52’ स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स विमानांनी कोरियन क्षेत्रातून भरारी घेतली. ‘एफ-35’ आणि ‘एफ-16’ या लढाऊ विमानांनी अमेरिकन बॉम्बरला साथ दिली होती. तर अमेरिकेची ‘युएसएस निमित्झ’ ही विमानवाहू युद्धनौका देखील आपल्या विनाशिकांच्या ताफ्यासह या सरावात उतरल्याचा दावा केला जातो. गेल्या आठवड्यात बुसान येथे तैनात झालेली निमित्झ युद्धनौका पुढील काही दिवस दक्षिण कोरियातच तैनात असेल, असे अमेरिकी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

korea kimहा सराव संपल्यानंतर अवघ्या काही तासातच उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तवाहिनीने अमेरिका आणि दक्षिण कोरियातील युद्धसरावावर ताशेरे ओढले. हा सराव म्हणजे उत्तर कोरियावर हल्ल्याची रंगीत तालिम होती, असा आरोप करून उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाला उद्देशून धमकी दिली. अमेरिका-दक्षिण कोरियाच्या युद्धसरावामुळे कोरियन क्षेत्र अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर उभा असल्याचा ठपका उत्तर कोरियाने ठेवला. अशा सरावामुळेच कोरियन क्षेत्रात युद्धाची ठिणगी पडेल, असा इशारा उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिला.

दरम्यान, उत्तर कोरियाने सातव्या अणुचाचणीची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. कोणत्याही क्षणी उत्तर कोरिया ही चाचणी घेऊ शकतो, अशी माहिती दक्षिण कोरियाचे संरक्षणमंत्री ली जाँग-सूप यांनी गुरुवारी दिली. दक्षिण कोरियाचे लष्कर उत्तर कोरियाच्या ‘प्युंगे-री’ अणुचाचणी तळावर बारीक लक्ष ठेवून असल्याचे संरक्षणमंत्री ली यांनी म्हटले आहे.

leave a reply