कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे अमेरिकेला अधिक यातना व त्रास भोगावा लागेल

- राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे सल्लागार अँथनी फाउची यांचा इशारा

त्रासवॉशिंग्टन – लस न घेतलेल्या नागरिकांमुळे अमेरिकेतील कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली असून भविष्यात अमेरिकेला अधिक वेदना व त्रास सहन करावा लागेल, असा इशारा अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार अँथनी फाउची यांनी दिला. अमेरिकेत जवळपास ६० टक्के नागरिकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. मात्र लसीकरणासाठी पात्र असणार्‍या १० कोटी नागरिकांनी अद्यापही लस घेतलेली नाही, याकडे फॉसी यांनी लक्ष वेधले असून त्यांच्यामुळे पुन्हा रुग्ण व बळींची संख्या वाढत असल्याचा दावा त्यांनी केला.

अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांची संख्या साडेतीन कोटींवर गेली असून आतापर्यंत साथीत ६.१३ लाख जण दगावले आहेत. लसीकरणाच्या मोहिमेला वेग दिल्याने अमेरिकेतील साथीचा फैलाव मंदावल्याचे चित्र समोर आले होते. मात्र गेल्या काही आठवड्यांमध्ये ‘डेल्टा व्हेरिअंट’मुळे अमेरिकेतील रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाल्याचे समोर येत आहे. या वाढणार्‍या रुग्णांपैकी मोठी संख्या लस न घेतलेल्या नागरिकांची असल्याचे उघड होत आहे. या पार्श्‍वभूमीवर फॉसी यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.

त्रास‘सात दिवसांमधील कोरोना रुग्णांची सरासरी आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढते आहे. हा वेग असाच कायम राहिला तर स्थिती अधिकच भयानक होऊ शकते. पात्र असूनही जवळपास १० कोटी नागरिकांनी अद्याप लस घेतलेली नाही. लॉकडाऊन लादण्याची वेळ येईल, असे मला वाटत नाही. पण वाढणार्‍या रुग्णांमुळे भविष्यात अमेरिकेला अधिक वेदना व त्रास सहन करावा लागेल’, असे फॉसी यांनी बजावले. हे घडू नये म्हणूनच लसीकरणाचा आग्रह धरला जात आहे, पण तसे घडताना दिसत नाही, या शब्दात त्यांनी चिंता व्यक्त केली.

जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत दर आठवड्याला आढळणार्‍या रुग्णांची सरासरी ७७ हजारांवर जाऊन पोहोचली आहे. १६ जुलैला हीच सरासरी ३० हजारांवर होती. याच काळात प्रतिदिन जाणार्‍या बळींची संख्याही २५३वरून ३५८ पर्यंत गेल्याचे सांगण्यात आले. फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेतील वाढत्या संक्रमणाचे नवे केंद्र ठरले आहे. शनिवारी फ्लोरिडामध्ये २१ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली.

२०१९ सालच्या अखेरीस चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीने जगभरात हाहाकार उडविला असून अजूनही त्याचा फैलाव वेगाने चालू आहे. जगभरात १९ कोटींहून अधिक कोरोना रुग्ण आढळले असून बळींची संख्या ४२ लाखांवर गेली आहे. जगातील अनेक प्रमुख देशांमध्ये साथीची दुसरी व तिसरी लाट सुरू आहे. कोरोनाव्हायरसचे नवे ‘स्ट्रेन’ विकसित होत असून त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

leave a reply