अमेरिकेच्या संरक्षण विभागातील ‘लीक’ची घटना अत्यंत गंभीर

‘पेंटॅगॉन’च्या प्रवक्त्यांची कबुली

The 'leak' incidentवॉशिंग्टन – अमेरिकेच्या संरक्षण विभागाशी निगडीत गोपनीय कागदपत्रे सोशल मीडियावर ‘लीक’ होण्याची घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिने अत्यंत गंभीर बाब असल्याची कबुली ‘पेंटॅगॉन’चे प्रवक्ते ख्रिस मेघेर यांनी दिली. या लीकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अपप्रचार केला जाऊ शकतो, अशी भीतीही मेघेर यांनी व्यक्त केली आहे. युक्रेनसह इराण तसेच चीनशी संबंधित माहिती असलेल्या गोपनीय कागदपत्रांच्या लीकमुळे अमेरिकेच्या मित्रदेशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. युरोपसह काही आघाडीचे देश यापुढे अमेरिकेला देण्यात येणाऱ्या गोपनीय माहितीबाबत फेरविचार करण्याच्या स्थितीत असल्याची माहिती वरिष्ठ युरोपिय अधिकाऱ्यांनी दिली. त्याचवेळी मित्रदेशांची नाराजी दूर करून ‘लीक’च्या मुद्यावर योग्य संवाद साधण्यासाठी अमेरिकेने परराष्ट्र विभागाच्या उपमंत्री वेंडी शेरमन यांची नियुक्ती केल्याचा दावा माध्यमांनी केला आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला एका सोशल मीडिया ॲपवर अमेरिकेच्या संरक्षण विभागाशी संबंधित काही कागदपत्रे प्रसिद्ध झाली होती. मात्र या घटनेकडे फारसे लक्ष गेले नव्हते. काही दिवसांपूर्वी ‘४चॅन’ नावाच्या ऑनलाईन फोरमवर संरक्षण विभागातील कागदपत्रे प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली. या फोरमवरील लिंक व स्क्रीनशॉटस्‌‍ टेलिग्राम तसेच ट्विटर या सोशल मीडिया नेटवर्कवर पोस्ट करण्यात आल्या. अमेरिकेतील आघाडीच्या माध्यमांनी यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केल्यावर बायडेन प्रशासनाने त्याची दखल घेतली.

pentagonअमेरिकेच्या संरक्षण विभागाने अंतर्गत तपास सुरू केला असून न्याय विभागाकडून स्वतंत्र चौकशी हाती घेण्यात आली आहे. मात्र सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या कागदपत्रांव्यतिरिक्त नक्की किती गोपनीय कागदपत्रे गहाळ झाली आहेत, हे अद्यापही उघड झालेले नाही. अमेरिकेच्या संरक्षण विभागालाही अद्याप ‘लीक’ची व्याप्ती पूर्णपणे लक्षात आलेली नसल्याचे दावे सूत्रांकडून करण्यात आले आहेत. अमेरिकेचा संरक्षण विभागच अंधारात असल्याचे समोर येत असल्याने मित्रदेशांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

मित्रदेशांकडून आक्रमक भूमिका घेतली गेल्याने आता अमेरिकेच्या संरक्षण विभागानेही ‘डॅमेज कंट्रोल’साठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. ‘पेंटॅगॉन’च्या प्रवक्त्यांनी लीक गंभीर असल्याची दिलेली कबुली त्याचाच भाग असल्याचे दिसते. याव्यतिरिक्त अमेरिकेने परराष्ट्र विभागाच्या उपमंत्र्यांसह एक स्वतंत्र गट तयार केला असून या गटाकडून मित्रदेशांशी बोलणी सुरू असल्याचा दावा माध्यमांनी केला आहे.

लीक झालेल्या कागदपत्रांमध्ये युक्रेन, चीन, इंडो-पॅसिफिक व इराणशी निगडित जवळपास १०० डॉक्युमेंटस्‌‍चा समावेश असल्याचे सांगण्यात आले. या सर्व डॉक्युमेंटस्‌‍वर ती ‘क्लासिफाईड’ असल्याचा उल्लेख आहे. त्याचवेळी यातील काही कागदपत्रे अमेरिकेसह पाच देशांचा गट असलेल्या ‘फाईव्ह आईज्‌‍’बरोबर शेअर करण्यात आल्याचेही समोर आले आहे.

leave a reply