देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन लाखांजवळ

नवी दिल्ली/मुंबई –  देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन लाखांजवळ पोहोचली आहे. रविवारी कोरोनाचे सार्वधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत सातव्या स्थानावर पोहोचला होता. रविवारपासून सोमवारच्या सकाळपर्यँत देशात या साथीने २३० जणांचा बळी गेला, तर तब्बल ८,३९२ नवे रुग्ण आढळल्याचे आरोग्यमंत्रालयाने जाहीर केले.  सलग दुसऱ्या दिवशी देशात चोवीस तासात आठ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे, तर शनिवारी  ७,९९४ नवे रुग्ण आढळले होते. त्यामुळे गेल्या तीन दिवसात देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या २५ हजाराने वाढली आहे.

coronavirus patients in india२५ मे रोजी भारत जगातील कोरोनाचे  सर्वाधिक रुग्ण असलेल्या पहिल्या १० देशांच्या यादीत दाखल झाला होता. त्यावेळी भारतात १ लाख ३५ हजार रूग्णांची नोंद झाली होती.  तर २८ मे रोजी भारत आशियातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनला होता. २८ मे रोजी देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या एक लाख ६५ हजारांच्या पुढे पोहोचली होती. पण कोरोनाच्या चाचण्यांमधील वाढीमुळे देशात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचा वेग अधिकच वाढला असून चारच दिवसात भारताने जगातील सर्वात जास्त रुग्ण संख्या असलेल्या देशांच्या यादीत फ्रान्सलाही मागे टाकले आहे.

लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात नियम अधिक शिथिल केले जात असताना देशात वाढत असलेली रुग्ण संख्या चिंतेचा विषय ठरतो. यामुळे राज्यांनी कंटेन्मेंट झोनमध्ये अधिक कठोरपणे नियमांची अमंलबजावणी करावी अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्या आहेत.  रविवारपासून सोमवारच्या सकाळपर्यँत देशात २३० जणांचा बळी गेला. तसेच देशातील एकूण रुग्ण संख्या एक लाख ९० हजारांवर पोहोचली, असे आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले. मात्र रविवारी रात्रीपर्यंत विविध राज्यांनी जाहीर केलेली माहिती पाहता देशातील या साथीच्या एकूण रुग्णांची संख्या १ लाख ९८ हजार १८२ वर पोहोचली असल्याचे स्पष्ट होते. 

सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाने ७६ जण दगावले तर २,३६१ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत ४० जणांचा बळी गेला, तर १३१९ नवे रूग्ण आढळले. मुंबईतील एकूण रूग्णांची संख्या ४१,०९९ वर पोहोचली आहे, तर मुंबईत आतापर्यंत १३१९ जण दगावले आहेत.  महाराष्ट्रात आतापर्यंत २,३६२ जण कोरोनाने दगावले असून एकूण रुग्णांची संख्या ७० हजारांच्या पुढे गेली आहे. 

दिल्लीत चोवीस तासात ५७ जणांचा बळी गेला, तर १,२९५ नव्या रुग्णांची नोंद झाली. नीति आयोगाच्या एका अधिकाऱ्याला व इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या  (आयसीएमआर) एका संशोधकालाही कोरोनाची  लागण झाल्याचे समोर येत आहे. दिल्लीत अचानक कोरोनामुळे होणारे मृत्यू आणि रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली आहे. यामुळे दिल्ली सरकारने राज्यांतर्गत लॉकडाऊनचे नियम थोडे शिथिल केले असले, तरी दिल्लीच्या सीमा पुन्हा सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत आतापर्यंत १९,९४० रुग्णांची नोंद झाली आहे. 

तामिळनाडूतही नवे रुग्ण सापडण्याचा वेग वाढला आहे. तामिळनाडूत सोमवारी ११ जण कोरोनामुळे दगावले, तर १,११२ नवे रुग्ण आढळले. रविवारी तामिळनाडूत चोवीस तासात १३ जणांचा बळी गेला होता आणि १,१४९ नवे रुग्ण आढळले होते.  महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर एका दिवसात हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झालेले तामिळनाडू हे देशातील तिसरे राज्य ठरले आहे. चेन्नईत सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २३,४९५ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रातनंतर सर्वाधिक रुग्ण याच राज्यात सापडले आहेत. 

गुजरातमध्ये एका दिवसात २५ जण दगावले, तर ४२३ नवे रुग्ण आढळले. याआधी रविवारी गुजरातमध्ये ३१ जणांचा बळी गेला होता, तर ४३८ नवे रुग्ण आढळले होते.  या राज्यातील बळींची संख्या १,०६३ झाली असून एकूण रुग्णांची संख्या १७,२१७ जवळ पोहोचली आहे. महाराष्ट्रानंतर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू गुजरातमध्ये झाले आहेत.  

leave a reply