भारतीय लष्कराने पीओकेमधील दहशतवाद्यांचे लाँचपॅड्स उडवून दिले

नवी दिल्ली – पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ भरलेले असून इथले दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याचा दावा, भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांनी एका दिवसांपूर्वीच केला होता. त्यांच्या या विधानानंतर पुंछ आणि राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेच्या पलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या लाँचपॅड्सवर घणाघाती हल्ले चढवून भारतीय लष्कराने  दहशतवाद्यांची दाणादाण उडवली आहे. या हल्ल्यात किमान ३० दहशतवादी ठार झाले असावेत, असा दावा केला जातो.

Indian Army blew up terrorists launch pad POKपाकिस्तानी लष्कराकडून रविवारी रात्रीपासून भारताच्या हद्दीत जोरदार गोळीबार सुरू होता. या गोळीबाराच्या आड दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये घुसविण्याचा डाव होता. पण भारतीय लष्कराने पाकिस्तानचा हा डाव हाणून पाडला. भारतीय माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमधून भारतीय लष्कराने पीओकेवर चढविलेल्या हल्ल्यात पंधरा ते पंचवीस दहशतवादी मारले गेले आहेत. कहूटा, कोटली, हाजिरा तसेच आणखी दोन लाँचपॅड्स भारतीय लष्कराने बेचिराख केल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर पाकिस्तानी जवान दहशतवाद्यांचे मृतदेह या ठिकाणाहून बाहेर काढून यासंदर्भातील पुरावे नष्ट करीत असल्याचा दावाही केला जात आहे.

राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागात भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. सोमवारी सकाळी दहशतवाद्यांच्या गटाने राजौरी भागातून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. पण गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांनी यावेळी केलेल्या कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले, तर उरलेल्या दहशतवाद्यांनी तिथून पलायन केले. या व्यतिरिक्त जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी बडगाममध्ये केलेल्या कारवाईत जैश-ए-मोहम्मदच्या सहा दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. या दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा तसेच एक किलो हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. या दहशतवाद्यांकडून हस्तगत केलेल्या शस्त्रास्त्रांमध्ये चिनी बनावटीचे पिस्तूल सापडले आहे.

भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या तनावाचा लाभ घेऊन पाकिस्तान जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी घुसविण्याच्या कटावर काम करीत आहे. मात्र, भारतीय लष्कराने आक्रमक कारवाई करून चीनबरोबर सीमावाद सुरू असतानाही  भारत-पाकिस्तानच्या कारवाया खपवून घेणार नाही  असा खणखणीत संदेश दिला आहे. भारताच्या सीमेवर लष्करी दबाव टाकून पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाच्या विरोधात भारताची कारवाई रोखण्याचा चीनचा प्रयत्न यशस्वी ठरणार नाही  असेही या कारवाईद्वारे भारताने चीनला बजावल्याचे दिसत आहे.

leave a reply