पॅलेस्टिनी पोलिसांनी इस्रायली लष्करावर हल्ले चढवावे

-वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी यंत्रणेला हमासची चिथावणी

hamas-terroristगाझा – गाझापट्टीतून इस्रायलवर हल्ले चढविणाऱ्या हमास या दहशतवादी संघटनेने पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँकमधूनही इस्रायलला लक्ष्य करण्याची योजना आखली आहे. हमासने वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी सुरक्षा यंत्रणेतील पोलिसांना इस्रायली नागरिक व लष्करावर हल्ले चढविण्याची चिथावणी दिली. गेल्या आठवड्यात पॅलेस्टिनी पोलिस जवानाने इस्रायली लष्कराच्या सुरक्षा चौकीवर हल्ला चढविला होता. या घटनेनंतर इस्रायली लष्कर व पॅलेस्टिनी सुरक्षा यंत्रणेत अविश्वास निर्माण झाल्याचा दावा केला जातो. ही संधी साधून हमासने पॅलेस्टिनी सुरक्षा यंत्रणेतील कट्टरवाद्यांना चिथावणी दिली आहे.

पॅलेस्टिनी जनतेची वस्ती गाझा आणि वेस्ट बँक अशा दोन ठिकाणी विभागली गेलेली आहे. यापैकी गाझामध्ये हमास कारभार करीत असून वेस्ट बँकमध्ये फताहचे प्रशासन आहे. दोन दशकांपूर्वी वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनींच्या सुरक्षेसाठी फताह पक्षाच्या नेतृत्वाखाली ‘नॅशनल सिक्युरिटी फोर्स’ची स्थापना करण्यात आली. या यंत्रणेवर वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी भागातील कायदा व सुव्यवस्था कायम राखणे तसेच इस्रायली सरकारला गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्यासाठी सहाय्य करण्याची जबाबदारी आहे. सदर पॅलेस्टिनी सुरक्षा यंत्रणेत जवळपास 42 हजारांहून अधिक जवान तैनात असून या ‘नॅशनल सिक्युरिटी फोर्स’च्या जबाबदाऱ्या अतिशय मर्यादित असल्याचा दावा केला जातो.

palestine-policeया पॅलेस्टिनी सुरक्षा यंत्रणेतील एक पथक गेल्या आठवड्यात वेस्ट बँकच्या नेब्लस भागात गस्त घालत होते. लष्करी वाहनातून प्रवास करणारे हे पथक इस्रायली लष्कराच्या सुरक्षा चौकीजवळ दाखल झाल्यानंतर या वाहनातील महमूद हाजिर या जवानाने इस्रायली लष्कराच्या दिशेने गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल इस्रायली लष्कराने केलेल्या कारवाईत हाजिर जखमी झाला. यानंतर जखमी हल्लेखोर हाजिरला इस्रायली दवाखान्यात दाखल केले गेले. पॅलेस्टिनी सुरक्षा यंत्रणेच्या जवानाने इस्रायली लष्करावर गोळीबार करण्याच्या घटनेने दोन्ही यंत्रणांना धक्का बसला होता.

वेस्ट बँकच्या नेब्लस आणि जेनिन या भागात पॅलेस्टिनी सुरक्षा यंत्रणेतील जवान आणि इस्रायली लष्करामध्ये अविश्वास वाढत चालल्याचा दावा केला जातो. या अविश्वासातूनच नेब्लससारख्या घटना पुढेही घडू शकतात, असा इशारा इस्रायली विश्लेषक देत आहेत. गेल्या वर्षी हमासने इस्रायलमध्ये शेकडोंच्या संख्येने रॉकेट्स व क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले होते. याच सुमारास वेस्ट बँकमधील नेब्लस, जेनिन या शहरातून इस्रायली सुरक्षा जवानांवर हल्ले झाल्याच्या घटनाही घडल्या होत्या. या दोन्ही शहरांमध्ये हमास व इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांचा प्रभाव वाढल्याचे यानंतर उघड झाले होते.

अशा परिस्थितीत, हमासचा प्रवक्ता अब्देल लतिफ अल-कानू याने वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी सुरक्षा यंत्रणेतील जवानांना इस्रायली लष्करावर हल्ले चढविण्यासाठी आवाहन केले आहे. हाजिरप्रमाणे पॅलेस्टिनी जवानांनी देखील इस्रायली नागरिक आणि लष्करावर हल्ले चढवावे आणि पॅलेस्टाईनचा भूभाग इस्रायलींपासून मुक्त करावा, अशी चिथावणी कानूने दिली आहे. हमासप्रमाणे इस्लामिक जिहाद व इतर दहशतवादी संघटनांनी देखील पॅलेस्टिनी सुरक्षा यंत्रणेने हाजिरचे अनुकरण करावे, असे सुचविले आहे. दहशतवादी संघटनांकडून पॅलेस्टिनी सुरक्षा यंत्रणेला केले जाणारे हे आवाहन इस्रायलसाठी घातक ठरू शकते. तसेच यामुळे वेस्ट बँकेचे प्रशासन चालविणाऱ्या फताह संघटनेसमोर देखील आव्हान उभे राहिल्याचे दिसत आहे.

leave a reply