इराकची संसद रिकामी करण्यास निदर्शकांचा नकार

-मागण्या मान्य झाल्याखेरीज संसद सोडणार नसल्याचा इशारा

Iraq-parliamentबगदाद – इराकच्या संसदेत ठिय्या मांडून बसलेल्या ‘मुक्तदा अल-सद्र’ यांच्या समर्थकांनी आपल्या मागण्या मान्य झाल्याखेरीज माघार घेणार नसल्याचे बजावले आहे. फार काळ या निदर्शकांना संसदे व ग्रीन झोनच्या परिसरात ठेवता येणार नाही, असे सांगून इराकी संसदेच्या सभापतींनी इराकच्या लष्कराला आवश्यक ती कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. मात्र शांतीपूर्ण निदर्शने करण्याचा अधिकार आपल्याला असल्याचे सांगून हे निदर्शक इथून माघार घेण्यास स्पष्टपणे नकार देत आहेत. अशा परिस्थितीत इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कधिमी यांनी पुन्हा एकदा इराकमधील सर्वच राजकीय पक्षांना चर्चेद्वारे समस्या सोडविण्याचे आवाहन केले आहे.

Protesters-refuseइराकच्या सरकारवरील इराणच्या प्रभावाविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारून मुक्तदा अल-सद्र यांच्या समर्थकांनी राजधानी बगदादमधील संसदेते व अतिसुरक्षित ग्रीन झोन भागात घुसखोरी केली. आपल्या मागण्या मान्य झाल्याखेरीज इथून माघार घेणार नाही, असे हे निदर्शक ठासून सांगत आहे. मात्र इराकच्या सरकारवरील इराणचा प्रभाव कमी करण्याची त्यांची प्रमुख मागणी सध्याच्या इराकी सरकारकडून मान्य होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही समस्या इतक्यात सुटण्याची शक्यता नाही. त्यामुळे निदर्शकांवर कारवाई करून संसद मोकळी करण्याचे आवाहन इराकी संसदेच्या सभापतींनी लष्करप्रमुखांना केले आहे.

iraq-parliament-protestनिदर्शकांवर कारवाईची भाषा केली जात असताना, पंतप्रधान कधिमी यांनी इराकमधील सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन चर्चा करावी, असा प्रस्ताव दिला. मात्र कुठल्याही पक्षाने देशद्रोह व दुसऱ्यांना वगळण्याची भाषा बोलू नये, राष्ट्रवादाच्या चौकटीतच ही चर्चा व्हावी, अशी अपेक्षा पंतप्रधान कधिमी यांनी व्यक्त केली आहे. तर इराकच्या कुर्दिस्तान या स्वायत्त प्रांताचे प्रेसिडेंट बर्झानी यांनी इरबिलमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी येऊन चर्चा करावी, असे आवाहन केले आहे.

इराकममध्ये या देशातील वांशिक व धार्मिक गटांचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या राजकीय पक्षांचे प्राबल्य आहे. त्यांच्यात राजकीय पातळीवर एकवाक्यता प्रस्तापित होणे अतिशय अवघड बनले आहे. आधीच्या काळात इराणबरोबर व त्यानंतर अमेरिकेबरोबरच्या युद्धात इराकमधील व्यवस्थेची दैना उडालेली आहे. या देशावरी आर्थिक संकट देखील तीव्र बनल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच इराणचा प्रभाव व इराकमधील कुर्दवंशियांवरी तुर्कीचे हल्ले आणि आयएससारख्या खतरनाक दहशतवादी संघटनेच्या कारवाया, ही इराकसमोरील फार मोठी आव्हाने ठरतात. अशा परिस्थितीत मुक्तदा अल-सद्र यांच्या समर्थकांनी इराकची संसद वेठीस धरून या देशासमोरील समस्या अधिकच वाढविल्या आहेत. पुढच्या काळात या राजकीय आंदोलनामुळे इराकमध्ये हिंसक संघर्ष पेट घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेजारी देशांचे इराकमधील हितसंबंध परस्परांच्या विरोधात खडे ठाकल्याने, इराकमधील या संघर्षाचे रुपांतर भीषण रक्तपातामध्ये होऊ शकते, असे काही विश्लेषक बजावत आहेत.

leave a reply