१९६२ सालच्या युद्धानंतर लडाखमधील परिस्थिती गंभीर बनली आहे

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

नवी दिल्ली – ‘१९६२ सालच्या युद्धानंतर पहिल्यांदाच या भागातील परिस्थिती सर्वात गंभीर बनली आहे. तब्बल ४५ वर्षानंतर या भागातील संघर्षात जवान शहीद झाले आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ दोन्ही देशांनी सैनिकांची केलेली तैनाती अभूतपूर्व आहे’, अशी प्रतिक्रीया परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली. त्याचबरोबर सीमावादाचा प्रश्न वाटाघाटीने सोडवायचा असेल तर याबाबत एकतर्फी निर्णय घेऊन चालणार नाही. तर भारताच्या मागण्यांचा आदर करुन त्याही मान्य कराव्या लागतील’, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी फटकारले. दोन दिवसांपूर्वी, चीनबरोबरील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरुन सुरु असलेली राजनैतिक चर्चा अपयशी ठरली, तर भारत लष्करी कारवाई करील असा इशारा संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दिला होता. यानंतर चीनने नरमाईची भाषा वापरुन भारताशी सहकार्य वाढविण्यावर भर दिला होता.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

लडाखच्या गलवान व्हॅलीत चीनने भारताचे २० जवान शहीद केल्यानंतर उभय देशांमधला तणाव वाढला होता. भारत आणि चीनने त्या भागातली तैनाती वाढविली असून सध्या या सीमेवर दोन्ही देशांचे मिळून किमान एक लाख सैनिक तैनात असल्याचा दावा केला जातो. तसेच भारताने त्या क्षेत्रात लढाऊ विमाने आणि रणगाडे तैनात केले आहेत. या दरम्यान, सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी उभय देशांच्या लष्करी अधिकार्‍यांमध्ये अनेकवेळा चर्चा झाल्या असून अजूनही यावर तोडगा सापडलेला नाही. चीनने देखील या भागात अधिकपटीने सैन्य तैनात करुन पँगाँग त्सो, देप्साँग, फिंगर क्लिफच्या भागातून सैन्य माघार घेण्याचे टाळले आहे. सॅटेलाईट फोटोग्राफ्समधून चीनची ही तैनाती उघड झाली आहे. अशावेळी परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला स्पष्ट शब्दात बजावल्याचे दिसत आहे.

उभय देशांमधला वाद टोकाला जाऊन पोहोचल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी एका वेबिनारला संबोधित करताना म्हटले आहे. गेल्या तीन ते साडेतीन महिन्यांपासून लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. अनेक राजनैतिक आणि लष्करी चर्चा पार पडल्या पण हा तणाव मिटलेला नाही , हे परराष्ट्रमंत्र्यांनी लक्षात आणून दिले. याच्या आधी भारत आणि चीनमध्ये सीमावादावरुन तणाव निर्माण झाला होता. पण राजनैतिक पातळीवर हे तणाव मिटविण्यात आले. सीमेवरील ‘देप्साँग’, ‘चुमार’, ‘डोकलाम’ भागात उभय देशांचे जवान एकमेकांसमोर खडे ठाकले होते. हे प्रत्येक वाद वेगवेगळे होते. पण ते राजनैतिक मार्गाने सोडविले गेले होते, असे परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले. पण लडाखमधला हा वाद गंभीर आहे त्याचा संबंध परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी थेट १९६२ सालच्या युध्दाशी जोडला. यावरून या तणावाची गंभीरता लक्षात येते.

या वादावर तोडगा काढण्यासाठी राजनैतिक आणि लष्करी अशा दोन्ही स्तरांवर प्रयत्‍न सुरू आहेत. पण या वादाचे निराकरण करायचे असेल तर याआधीच्या करारांची आणि मागण्यांचा आदर करुन त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. एकतर्फी हालचाली करुन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील यथास्थिती बदलण्याचा प्रयत्‍न करू नये, अशा स्पष्ट शब्दात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी चीनला फटकारले. त्याचबरोबर सीमेवरील चीनची तैनाती खपवून घेतली जाणार नसल्याचे जयशंकर म्हणाले. त्याचबरोबर, दोन्ही देशांमधील सहकार्याच्या आधारावर भारत सीमेवर शांतता राखेल, असा संदेश भारताने चीनला दिल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी वाटाघाटी अपयशी ठरल्या तर चीनच्या विरोधात लष्करी कारवाईचा पर्याय खुला असल्याचा इशार दिला होता. संरक्षणदलप्रमुखांच्या विधानानंतर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी राजनैतिक आघाडीवरही चीनवरील दडपण वाढविल्याचे दिसत आहे.

leave a reply