अमेरिका-दक्षिण कोरियाचा युद्धसराव म्हणजे उत्तर कोरियाविरोधातील युद्धाची घोषणा ठरते

उत्तर कोरियाची नवी धमकी

stretegic_threatसेऊल – ‘अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा नवा युद्धसराव उत्तर कोरियाच्या सीमेजवळ पार पडला, तर ही अमेरिकेची उत्तर कोरियाविरोधातील थेट युद्धाची घोषणा मानली जाईल’, अशी धमकी उत्तर कोरियाने दिली. या धमकीच्या काही तास आधी अमेरिकेची आण्विक पाणबुडी दक्षिण कोरियाच्या बुसान बंदरात दाखल झाली आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या उत्तर कोरियाने अमेरिकेला धमकावल्याचे दिसत आहे.

us submarineदोन दिवसांपूर्वी, गुरुवारी उत्तर कोरियाने क्रूझ्‌‍ क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. उत्तर कोरियाच्या वाढत्या धोक्यांविरोधात अमेरिका व दक्षिण कोरिया ‘सिम्युलेशन एक्सरसाईज’ करीत असताना उत्तर कोरियाने ही चाचणी घेली. येत्या काळात आपल्यावर अणुहल्ला झाल्यास त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी क्षेपणास्त्रे कशी कार्यरत करता येतील याची चाचणी घेण्यासाठी सदर क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याची माहिती उत्तर कोरियाच्या वृत्तसंस्थेने दिली होती.

उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी करण्याची गेल्या सात दिवसातील तिसरी तर नव्या वर्षातील चौथी चाचणी ठरली. काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाने आपल्या लष्करी संचलनात ११ आंतरखंडीय बॅलेस्टिक व एक द्रव-इंधनावर आधारीत लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र पहिल्यांदाच प्रदर्शित केले होते. उत्तर कोरियाच्या हुकूमशाही राजवटीतील हे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे लष्करी सामर्थ्यप्रदर्शन ठरले होते. याच्या दोन आधी उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग-उन याने आपल्या लष्कराला युद्धासाठी तयारी करण्याचे आदेश दिले होते.

U.S.-South Korea warउत्तर कोरियाकडून वाढत असलेल्या या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, अमेरिका व दक्षिण कोरियाने विशेष लष्करी सहकार्य प्रस्थापित करण्याचे जाहीर केले. उत्तर कोरियाच्या विरोधात दक्षिण कोरियाला संरक्षित करण्यासाठी या देशात अण्वस्त्रे तैनात करण्याचे संकेतही अमेरिकेने दिले होते. त्याचबरोबर अमेरिका व दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाविरोधी नवा युद्धसराव सुरू केला. पण दोन्ही देशांचा हा युद्धसराव म्हणजे आपल्याविरोधात युद्धाची घोषणा ठरते, असे उत्तर कोरियाने धमकावले.

असे असताना, अमेरिकेची ६००० टन वजनाची, लॉस एंजेलिस श्रेणीतील ‘युएसएस स्प्रिंगफिल्ड’ ही वेगवान आण्विक पाणबुडी दक्षिण कोरियाच्या बुसान बंदरात दाखल झाली आहे. आपल्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सदर पाणबुडी बुसान बंदात दाखल झाल्याचा दावा केला जातो. उत्तर कोरियाबरोबर वाढत असलेल्या तणावाचा सदर पाणबुडीशी संबंध नसल्याचे अमेरिका व दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील ‘गुआम’ बेटावर तैनात अमेरिकेच्या सातव्या आरमारामध्ये ही पाणबुडी सागरी गस्तीसाठी वापरली जात आहे. त्यामुळे या पाणबुडीचे दक्षिण कोरियात झालेले आगमन लक्षवेधी ठरत आहे.

दरम्यान, ज्यो बायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे हातात घेतल्यापासून उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांची संख्या भयावहरित्या वाढल्याचे अमेरिकन वृत्तसंस्था लक्षात आणून देत आहे. २०२२ साली उत्तर कोरियाने गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक क्षेपणास्त्रांची चाचणी केल्याचे अमेरिकन वृत्तसंस्थांचे म्हणणे आहे.

leave a reply