‘एफएटीएफ’ने रशियाचे सदस्यत्व काढून घेतले

युएई, तुर्की, दक्षिण आफ्रिका ‘ग्रे लिस्ट’मध्ये तर पाकिस्तानला इशारा

FATF Parisपॅरिस – जगभरातील आर्थिक गुन्हेगारीवर नजर ठेवणाऱ्या ‘फायनॅन्शिअल ॲक्शन टास्क फोर्स-एफएटीएफ’ने शुक्रवारी रशियाला आपल्या संघटनेच्या सदस्यत्वातून बरखास्त केले. रशियाने युक्रेनच्या विरोधात छेडलेल्या युद्धाने या संघटनेच्या मुल्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप करून ‘एफएटीएफ’ने ही कारवाई केली. तर युएई व तुर्कीला ‘ग्रे लिस्ट’मध्ये कायम ठेवले असून दक्षिण आफ्रिका व नायजेरिया यांना पहिल्यांदाच या यादीत सामील केले आहे.

एफएटीएफची साप्ताहिक बैठक फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे पार पडली. यावेळी एफएटीएफचे अध्यक्ष टी. राजा कुमार यांनी आर्थिक गुन्हेगारी विरोधात कारवाई करणाऱ्या संघटनेतून रशियाला काढल्याचे जाहीर केले. यासाठी राजा कुमार यांनी युक्रेनवरील हल्ल्याचे कारण दिले. पण अमेरिका व युरोपिय देशांच्या दबावाखाली येऊन एफएटीएफने ही कारवाई केल्याचा दावा रशियन माध्यमे करीत आहेत.

putin mbzerdoganramphosa

 

 

 

 

गेल्या दोन दिवसांपासून अमेरिका, युरोपिय तसेच मित्रदेशांनी रशियावर नव्याने निर्बंध लादण्याचा सपाटा लावला आहे. जी-७ सदस्य देशांनी रशियावरील निर्बंधांचा समर्थन दिले आहे. रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी हे निर्बंध आवश्यक असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, एफएटीएफच्या या रशियाविरोधी निर्णयाकडे पाहिले जाते. युक्रेनने एफएटीएफच्या या निर्णयाचे स्वागत केले. याबरोबरच एफएटीएफने गेल्या वर्षी ‘ग्रे लिस्ट’मध्ये सामील केलेल्या युएई व तुर्कीला या यादीत कायम ठेवून आर्थिक गैरव्यवहाराबाबत योग्य पावले उचलण्याचे आवाहन केले. तर दक्षिण आफ्रिका आणि नायजेरिया या देशांना पहिल्यांदाच या यादीत सामील केले. तर इराण, उत्तर कोरिया आणि म्यानमारला काळ्या यादीत कायम ठेवले आहे.

दरम्यान, एफएटीएफने पाकिस्तानचेही कान पिळले आहेत. आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सईद सलाहुद्दीन या सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात रावळपिंडी येथे फिरत असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. हिजबुलचा तिसऱ्या क्रमांकाचा नेता बशिर अहमद ठार झाल्यानंतर त्याच्या दफनविधीसाठी सलाहुद्दीन उपस्थित होता व त्याच्या बाजूला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी देखील होते. सुरक्षा यंत्रणा व दहशतवाद्याची ही संगत लक्षात घेऊन एफएटीएफचे अध्यक्ष राजा कुमार यांनी पाकिस्तानच्या हालचालींवर बारीक नजर असल्याचे म्हटले आहे.

leave a reply