रशियाकडून इंधनाची खरेदी करणाऱ्या भारतावर निर्बंध लादण्याचा अमेरिकेचा विचार नाही

अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांचा दावा

वॉशिंग्टन – युक्रेनच्या युद्धानंतर अमेरिकेने रशियाच्या इंधनविक्रीवर लादलेल्या निर्बंधांची पर्वा न करता भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात इंधनाची खरेदी सुरू केली आहे. यामुळे रशिया भारताला इंधनाचा पुरवठा करणारा पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे. दोन्ही देशांमधील या व्यवहारावर आक्षेप घेऊन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी भारतावर निर्बंध लादण्याचे आवाहन केले होते. मात्र भारत हा अमेरिकेचा भागीदार देश असून भारतावर निर्बंध लादण्याचा अमेरिकेचा विचार नसल्याचा निर्वाळा अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्री कॅरन डॉनफ्रिड यांनी दिला आहे.

Karen_Donfriedभारत रशियाकडून इंधनाची खरेदी करीत असला तरी अमेरिकेचा या व्यवहारावर आक्षेप नाही. त्यामुळे भारतावर निर्बंध लादण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या युरोप व युरेशियन व्यवहार विभागाच्या उपमंत्री कॅरन डॉनफ्रिड यांनी म्हटले आहे. तसेच भारत व अमेरिकेचे संबंध अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, याकडे डॉनफ्रिड यांनी लक्ष वेधले. धोरणांच्या पातळीवर काही मतभेद असले तरी भारत व अमेरिका हे आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या पालनाचा आग्रह धरणारे देश आहेत. दुसऱ्या देशांचे सार्वभौमत्त्व आणि क्षेत्रिय अखंडतेला भारत व अमेरिका नेहमीच महत्त्व देत आले आहेत, असे सांगून कॅरन डॉनफ्रिड यांनी भारताबरोबरील अमेरिकेच्या संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले.

सध्या भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात इंधनाची खरेदी करीत असला, तरी या दशकाच्या अखेरपर्यंत रशियाकडून विक्री केल्या जाणाऱ्या इंधनाचे प्रमाण 50 टक्क्यांवर येणार असल्याचा दावा डॉनफ्रिड यांनी केला. रशियाच्या अर्थव्यवस्थेवर अमेरिकेच्या निर्बंधांचे परिणाम दिसूही लागले आहेत. मात्र अमेरिकेचे निर्बंध जगभरात लागू पडतील, असे आम्हाला वाटत नाही. म्हणूनच भारत रशियाकडून करीत असलेल्या इंधनाच्या खरेदीवर अमेरिका नाराज नाही, असा दावा डॉनफ्रिड यांनी केला आहे.

दरम्यान, रशियाकडून खरेदी केलेले इंधनतेलाचे शुद्धीकरण करून भारतीय कंपन्या त्याच इंधनतेलाची अमेरिकेला विक्री करीत असल्याची माहिती समोर आली होती. अमेरिकन वृत्तवाहिन्यांनी यासंदर्भात भारताचे पेट्रोलियममंत्री हरदीप सिंग पुरी यांना प्रश्न विचारले होते. मात्र अमेरिकेबरोबरील हा व्यवहार भारताच्या राष्ट्रीय कंपन्या करीत नसून भारताच्या खाजगी कंपन्या असा व्यवहार करीत असतीलही, असे उत्तर हरदीप सिंग पुरी यांनी दिले होते.

leave a reply