भारत व इस्रायलच्या पंतप्रधानांची फोनवर चर्चा

PM-India and Israelनवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांची फोनवरून चर्चा पार पडली. दोन्ही देशांमधील सहकार्य अधिकच दृढ व व्यापक करण्याचा निर्णय या चर्चेत झाल्याची माहिती इस्रायली पंतप्रधानांच्या कार्यालयाने दिली. पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी देखील सोशल मीडियावरून या चर्चेची माहिती देऊन दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि सुरक्षेच्या आघाडीवरील सहकार्य अधिक व्यापक केले जाईल, असा दावा केला.

युक्रेनचे युद्ध सुरू असतानाच, आखाती क्षेत्रातील तणावही वाढत चालला आहे. त्यातच निकटतम सहकारी देश असलेल्या अमेरिका व इस्रायलच्या नव्या सरकारमधील मतभेदही वाढत आहेत. अशा परिस्थितीत इस्रायलच्या पंतप्रधानांची भारताच्या पंतप्रधानांबरोबर झालेली ही चर्चा लक्ष वेधून घेत आहे. फोनवर सुमारे 20 मिनिटे चाललेल्या या चर्चेत संरक्षण व सुरक्षेसंदर्भातील सहकार्य व्यापक करण्यासंदर्भात माहिती देत असतानाच, दोन्ही देशांच्या संबंधांसाठी उत्साहवर्धक काळ आलेला आहे, असे सूचक विधान इस्रायलच्या पंतप्रधानांनी केले. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस इस्रायलच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बेंजमिन नेत्यान्याहू यांचे पंतप्रधान मोदी यांनी फोनवरून अभिनंदन केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी व नेत्यान्याहू यांच्यात ही चर्चा झाल्याचे दिसत आहे. याचे तपशील अजूनही समोर आलेले नाहीत. मात्र सध्या जगभरात, विशेषतः आखाती क्षेत्रात सुरू असलेल्या उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर भारत व इस्रायलच्या नेत्यांची ही चर्चा लक्षणीय ठरते.

leave a reply