लादेनला शहीद मानणाऱ्यांनी दहशतवादावर उपदेश देऊ नये – संयुक्त राष्ट्रसंघात भारताची पाकिस्तानला चपराक

नवी दिल्ली – भारतात २६/११, पठाणकोट, पुलवामा सारखे हल्ले करणारा देश आंतराष्ट्रीय समुदायाला दहशतवादावरून उपदेश करीत आहे. एका बाजूला पाकिस्तान अल कायदा आणि इतर दहशतवादी संघटनांवर कारवाईची भाषा करतो आणि दुसऱ्या बाजूला या देशाचे पंतप्रधान अमेरिकेत ९/११ चा हल्ला घडविणाऱ्या ओसामा बिन लादेनला शहीद म्हणतात. हेच या देशाचे चरित्र आहे, अशा शब्दात भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्हर्च्युअल बैठकीत पाकिस्तानचे वाभाडे काढले.

दहशतवादावर उपदेश

संयुक्त राष्ट्रसंघाकडून व्हर्च्युअल दहशतवादविरोधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच भाग असलेल्या एका व्हर्च्युअल बैठकीत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव महावीर सिंघवी यांनी पाकिस्तानला फटकारले. याआधी पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी केलेल्या भाषणात दोन आठवड्यांपूर्वी कराचीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे भारत असल्याचे आरोप लावले होते. याचाही समाचार सिंघवी यांनी घेतला.

”सारे जग कोरोनाच्या साथीचा सामना करीत असताना पाकिस्तानची दहशतवादी कारस्थाने सुरु आहेत. जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद माजविण्यासाठी पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठवत आहे. दहशतवाद्यांना पैसा पुरवीत आहे, ड्रोनच्या सहाय्याने त्यांना शस्त्र पुरवठा करीत आहे. तसेच भारताच्या कायद्यांबाबत चुकीची माहितीही पसरवीत आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात पाकिस्तान आपली पूर्ण शक्ती भारताविरोधात बिनबुडाचे आरोप लगावण्यात आणि अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप करण्यात खर्च करीत आहे”, असे सिंघवी म्हणाले.

दहशतवादावर उपदेश

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात कारवाईची भाषा करतो, मात्र या देशाचे पंतप्रधान आपल्या संसदेत लादेनला शहीद म्हणतात. हा पाकिस्तानकडून दहशतवादाला किती प्रोत्साहन दिले जाते, याचा भयावह पुरावा आहे. भारताचे दहशतवादाबाबतचे धोरण स्पष्ट आहे. त्यामुळे कराचीमधील हल्ल्याची भारत घोर निंदा करतो. मात्र पाकिस्तान जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाला दहशतवाद मानतच नाही, याकडे सिंघवी यांनी संयुक्त राष्ट्र संघाचे लक्ष वेधले.

पाकिस्तानचे पंतप्रधानांनी याआधी स्वतःचा आपल्या देशात ४० हजार दहशतवादी होते, ही बाब स्वतःहून मान्य केली होती. तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्याच एका पथकाने ‘लश्कर-ए-तोयबा’, ‘जैश-ए-मोहम्मदचे’ ६५०० दहशतवादी अफगाणिस्तानात सक्रिय असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे दहशतवादाचे नंदनवन असलेल्या अशा देशाने अंतरराष्ट्रीय समुदायाला दहशतवादाबाबत उपदेश देऊ नयेत, अशी जोरदार चपराक सिंघवी यांनी पाकिस्तानला लगावली.

leave a reply