चीनच्या विस्तारवादाचा धोका संपलेला नाही – अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

वॉशिंग्टन – लडाखच्या सीमेवर चीनच्या आक्रमकतेला भारताने जबरदस्त प्रत्युत्तर दिले. मात्र येत्या काळात चीनमधील शी जिनपिंग यांची राजवट भारत किंवा इतर शेजारी देशांच्या विरोधात आक्रमक भूमिका स्वीकारणार नाही, अशा भ्रमात कुणीही राहू नये. जिनपिंग यांच्या कम्युनिस्ट राजवटीकडून आपल्याला असलेला धोका जगाच्या लवकरच लक्षात येईल आणि सारे जग चीनच्या विरोधात एकसंघ होऊन या राजवटीला प्रत्युत्तर देईल, असा विश्वास अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी व्यक्त केला. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर पॉम्पिओ यांनी हे दावे केले आहेत.

विस्तारवादाचा धोका

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव कमी करण्यासाठी चीनचे लष्कर गलवान, हॉट स्प्रिंग्स, आणि पँगॉन्ग त्सो या भागातून मागे सरकले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांच्यात बुधवारी चर्चा पार पडली. यानंतर पत्रकारांशी बोलताना भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांशी आपली अनेकवेळा चर्चा झाल्याचे पॉम्पिओ यांनी सांगितले. त्याचबरोबर चीनच्या विस्तारवादी धोरणाबाबत साऱ्या जगाला सावध केले.

‘लडाखमधील संघर्ष म्हणजे, चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या आक्रमकतेचे शेवटचे प्रदर्शन असेल. याच्यापुढे शहाणा झालेला चीन अशाप्रकारे आक्रमकता प्रदर्शित करणार नाही, असा गैरसमजात कोणीही राहू नये. लडाखमधील घटनेकडे अधिक व्यापक दृष्टीकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या क्षेत्रातच नाही, तर साऱ्या जगात अशीच विस्तारवादी धोरणे आखली आहेत’, असा हल्ला अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चढविला. चीनची सीमा जेवढ्या देशांबरोबर भिडलेली आहे, त्याहून अधिक देशांबरोबर चीनचा सीमावाद सुरू आहे, याची जाणीव परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी यावेळी करून दिली.

‘हिमालयाच्या पर्वतराजीपासून, व्हिएतनामचे सागरीक्षेत्र ते सेंकाकू बेटापासून त्याही पलीकडच्या क्षेत्रावर आपला हक्क सांगण्यासाठी चीनने विशिष्ट पॅटर्न स्वीकारलेला आहे. गेली काही वर्षे चीन आपल्या शेजारी देशांच्या विरोधात याच पद्धतीने कारवाई करीत आहे. चीनची सुरू असलेली ही अरेरावी जगाने यापुढे खपवून घेऊ नये’, अशा शब्दात अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला लक्ष्य केले. तर, ‘आज चीनचा कुठलाही शेजारी देश आपली सार्वभौम सीमारेषा येथे पूर्ण होते, असे खात्रीने सांगू शकत नाही. कारण चीनची कम्युनिस्ट पार्टी त्यांच्या या सार्वभौम सीमेचा आदर करीत नाही. सध्या भूतानच्याबाबतीत देखील हेच घडत आहे. तेव्हा चीनच्या या अरेरावीला उत्तर देण्यासाठी जगाने संघटीत व्हावे’, असे आवाहन पॉम्पिओ यांनी यावेळी केले.

‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या या विस्तारवादी भूमिकेकडे अधिक गांभीर्याने पाहत असून आमची ही नाराजी चीनपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. इथे आमची म्हणजे एकट्या अमेरिकेची नाराजी नाही. तर युरोपीय महासंघातील अमेरिकेच्या मित्रदेशांचाही यात समावेश आहे. या मित्रदेशांना सोबत घेऊन चीनला कसे प्रत्युत्तर देता येईल, यासाठी आमची चर्चाही सुरू झाली आहे’, असे लक्षवेधी विधान अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केले आहे.

leave a reply