पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे तीन जवान शहीद

- भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी लष्कराची मोठी हानी झाल्याचे दावे

श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रणरेषेवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबार आणि मॉर्टर्स हल्ल्यात भारताचे तीन जवान शहीद झाले. तसेच पाच जण जखमी झाले आहेत. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या गोळीबाराला तोफांचा मारा करून सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे. यामुळे पाकिस्तानची मोठी हानी झाली असून पाकिस्तानमध्ये २० जण ठार झाल्याचे दावे करण्यात येत आहेत. मात्र याबाबत तपशील समोर आलेले नाहीत.

तीन जवान शहीद

गुरुवारी जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रणरेषेवरील नौगाम सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराने सकाळपासूनच मॉर्टर्सचे हल्ले सुरु केले. याशिवाय पाकिस्तानच्या लष्कराकडून केरन आणि माछील सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. नौगाममध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले. तर बुधवारी रात्री पुंछ जिल्ह्यातल्या कृष्णाघाटी सेक्टर परिसरात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे लान्स नायक करनेल सिंग शहीद झाले होते.

भारतीय लष्कर पाकिस्तानच्या या चिथावणीला सडेतोड प्रत्युत्तर देत आहे. हा संघर्ष अजूनही सुरु असल्याचे सांगितले जाते केवळ सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानने ४७ वेळा संघर्षबंदीचे उल्लंघन केले आहे. तर गेल्या आठ महिन्यात पाकिस्तानकडून तीन हजारहून अधिक वेळा संघर्षबंदीचे उल्लंघन झाले आहे. पण वेळोवेळी पाकिस्तानला भारतीय लष्कराकडून सपाटून मार खावा लागत आहे. पण असे असले तरी पाकिस्तानच्या नियंत्रणरेषेवरच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या विश्लेषकांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता असल्याची भिती व्यक्त केली होती.

leave a reply