भारताच्या बंदीमुळे ‘टिकटॉक’चे ४५ हजार कोटींचे नुकसान

पंतप्रधान मोदी यांचे 'ॲप इनोव्हेशन चॅलेंज'

नवी दिल्ली – गलवानमधील चीनच्या विश्वासघातानंतर भारताने घातलेल्या ‘चिनी अ‍ॅप्सवरील बंदीचा मोठा आर्थिक फटका हे अ‍ॅप्स चालविणाऱ्या चिनी कंपन्यांना बसला आहे. एकट्या ‘टिकटॉक’ चालविणाऱ्या ‘बाईटडान्स’ कंपनीलाच ४५००० कोटी रुपयांचे (६ अब्ज डॉलर्स) नुकसान उचलावे लागेल, असा अंदाज आहे. तर इतकेच नुकसान चीनच्या इतर अ‍ॅप्स कंपन्यांना मिळून होणार आहे. हा दावा चीनच्याच माध्यमांनी केला आहे. चीनच्या कंपन्यांना भारताच्या बंदीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानाची बातमी समोर येत असताना पंतप्रधान मोदी यांनी ‘ॲप इनोव्हेशन चॅलेंज’ लॉन्च केले आहे.

भारताने एकूण ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी टाकली आहे. यामध्ये टिकटॉक आणि हॅलोसह यूसी ब्राउजर, कॅमस्कॅनर, शेअरइट, विचॅट व इतर प्रसिद्ध अ‍ॅप्सचा समावेश आहे. या सर्व चिनी अ‍ॅप्सचे युजर्स भारतातच सर्वाधिक आहेत. देशात स्मार्ट फोन वापरणाऱ्यांकडे २०० अ‍ॅप्सपैकी ३८ टक्के चीनी अ‍ॅप्स आहेत. चीनच्या ‘बाईटडान्स’ कंपनीचे ‘टिकटॉक’, ‘हॅलो’ आणि वीगो अ‍ॅप्सदेखील भारतात लोकप्रिय बनले होते. मात्र भारताच्या बंदीनंतर या अ‍ॅप्सनी आपला युजर बेस गमावला असून जगभरात विस्ताराच्या योजनेलाही धक्का लागला आहे.

‘बाईटडान्स’ या चिनी कंपनीला एकट्या ‘टिकटॉक’वरील बंदीमुळे ४५ हजार कोटींचे नुकसान होण्याची अंदाज आहे. ‘काईशिन ग्लोबल’ या चिनी माध्यम संस्थेने आपल्या वेबसाईट्वर ‘बाईटडान्स’ कंपनीच्या एका व्यवस्थापकाच्या हवाल्याने हा दावा केला आहे. तसेच भारताने बंदी घातलेल्या इतर चिनी अ‍ॅप्स कंपन्याही कोट्यवधींचा फटका बसला आहे. मात्र या अ‍ॅप्स कंपन्यांना जेवढे नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यांच्या एकूण नुकसानपेक्षा अधिक नुकसान ‘बाईटडान्स’ सहन करावे लागणार आहे, असेही या वेबसाईटने केलेल्या दाव्यात म्हटले.

काही दिवसांपूर्वी भारतात चीनी उत्पादनांवर बंदीच्या मोहिमेवर आणि अ‍ॅप्सवर बंदीच्या निर्णयावर चीनच्या सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने टीका केली होती. या चीनी उत्पादनांवर बंदी घालून भारताचेच नुकसान होईल असा दावा ग्लोबल टाइम्सने केला होता. प्रत्यक्षात भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे चीनचे धाबे यावेळी दणालेले असून भारताकडून आर्थिक पातळीवर मिळणाऱ्या प्रत्युत्तर चीनला मोठे धक्के बसत आहेत, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी शनिवार ‘ॲप इनोव्हेशन चॅलेंज’ लॉन्च केले. चिनी अ‍ॅप्सवरील बंदीनंतर ‘मेड इन इंडिया’ अ‍ॅप्सला चालना देण्यासाठी, तरुणांना असे अ‍ॅप्स बनविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हे चॅलेंज देण्यात आले आहे. डिझिटल इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत पंतप्रधानांनी हे ॲप चॅलेंज लॉन्च केले आहे.

leave a reply