अमेरिकेमध्ये भारतीयांसह तैवान व तिबेटी गटांची ‘बॉयकॉट चायना’ निदर्शने

न्यूयॉर्क – चीनने गलवान व्हॅलीत भारतीय सैनिकांवर केलेल्या भ्याड व विश्वासघातकी हल्ल्याचे तीव्र पडसाद भारतापाठोपाठ इतर देशांमध्येही उमटू लागले आहेत. चीनच्या हल्ल्यानंतर त्या देशाला आर्थिक पातळीवर दणका देण्यासाठी भारतात ‘बॉयकॉट चायना’ मोहीम सुरू करण्यात आली होती. त्याला इतर देशांमधील अनिवासी भारतीयांकडूनही साथ मिळत असून अमेरिकेतील भारतीय समुदायाने हा मुद्दा उचलून धरला आहे. शुक्रवारी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर भागात अनिवासी भारतीयांच्या गटांनी ‘बॉयकॉट चायना’ निदर्शने केली. यावेळी अमेरिकेतील तैवानी तसेच तिबेटी गटांनीही निदर्शनांमध्ये सहभाग घेतल्याने याकडे लक्ष वेधले गेले आहे.

अमेरिकेमध्ये भारतीयांसह तैवान व तिबेटी गटांची 'बॉयकॉट चायना' निदर्शनेकोरोनाची साथ व त्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून सुरू असणाऱ्या कारवाया यामुळे जगभरात चीनविरोधात तीव्र संतापाची भावना आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेले व्यापारयुद्ध व त्यानंतर आलेला कोरोनाच्या साथीने, जगाची फॅक्टरी म्हणून ओळख मिळालेल्या चीनला धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. उघुरवंशीयांसह इतर अनेक मुद्यांवर चीनला धारेवर धरणाऱ्या अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने गेल्या काही वर्षांपासून चिनी उत्पादनांची आयात कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर या प्रक्रियेला अधिक वेग आला असून जगातील इतर देशही आता त्यात सामील होऊ लागले आहेत.

गेल्या महिन्यात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय लष्करावर केलेल्या हल्ल्यात २० सैनिक शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर संपूर्ण भारतभरात चीनविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली असून सर्व पातळ्यांवर चीनला दणका देण्याची मागणी जोर धरत आहे. चिनी उत्पादनांवर बहिष्कार हा त्याचाच एक भाग असून भारत सरकारसह देशातील प्रमुख उद्योग संघटनांनीही त्यासाठी निर्णायक पावले उचलली आहेत. परदेशात वास्तव्यास असणाऱ्या भारतीय समुदायानेही याचे जोरदार समर्थन केले असून अमेरिकेत सुरू झालेले निदर्शने याचाच भाग आहे.

अमेरिकेमध्ये भारतीयांसह तैवान व तिबेटी गटांची 'बॉयकॉट चायना' निदर्शनेअमेरिकेतील भारतीयांच्या प्रमुख गटांपैकी एक ‘अमेरिकन इंडिया पब्लिक अफेअर्स कमिटी’ने शुक्रवारी ‘बॉयकॉट चायना‘ निदर्शनांचे आयोजन केले होते. यावेळी आयोजकांनी चीनविरोधात घोषणा देतानाच या देशातील कम्युनिस्ट राजवटीचा उल्लेख बदमाश राजवट असा केला. त्याचवेळी चीन विरोधात संघर्ष करण्याची हीच वेळ असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने तीन ‘टी’चा वापर करायला हवा असे आवाहनही केले. हे तीन ‘टी’ म्हणजे ‘ट्रेड’, ‘तैवान’ व ‘तिबेट’ हे असल्याचेही ‘अमेरिकन इंडिया पब्लिक अफेअर्स कमिटी’ने सांगितले.

अमेरिकेतील भारतीय समुदायाच्या गटांनी आयोजित केलेल्या निदर्शनांमध्ये तैवान तसेच तिबेटशी निगडित गटांचा सहभाग लक्ष वेधून घेणारा ठरला. या गटांनी आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढील काळात ‘वन चायना पॉलिसी’चा आग्रह सोडून द्यावा, अशी मागणी निदर्शनांदरम्यान केली. त्याचवेळी भारतीय गटांनी अमेरिकेत सुरू केलेल्या ‘बॉयकॉट चायना’ मोहिमेला आपण पूर्णपणे साथ देऊ अशी ग्वाहीदेखील दिली.

leave a reply