‘क्वाड’च्या विस्ताराची वेळ आलेली आहे

- अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली – चीनची जहाल प्रतिक्रिया येईल, हे लक्षात घेऊन अमेरिका आणि भारताने आत्तापर्यंत क्वाड’ सहकार्याच्या विस्ताराबाबत अतिशय सावध भूमिका घेतली होती. मात्र येत्या काळात समान हितसंबंध तसेच स्वतंत्र आणि मुक्त इंडो-पॅसिफिकबाबत एकमत असलेल्या देशांना सहभागी करुन ‘क्वाड’चा विस्तार करण्याची वेळ आलेली आहे, असे अमेरिकेचे उपपरराष्ट्रमंत्री स्टिफन बेगन यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर भारत आणि अमेरिकेतील सुरक्षाविषयक संबंध नवी उंची गाठू शकतात, असा विश्वास बेगन यांनी व्यक्त केला. या महिन्याच्या अखेरीस भारत आणि अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्र्यांमध्ये ‘टू प्लस टू’ अशी चर्चा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपपराष्ट्रमंत्री भारताच्या तीन दिवसांच्या दौर्‍यावर आले आहेत.

विस्ताराची वेळ

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेऊन अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांनी उभय देशांमधील संरक्षण सहकार्य आणि ‘क्वाड’बाबत तसेच जागतिक राजकारण व क्षेत्रीय घडामोडींवर चर्चा केली. उभय देशांमधील द्विपक्षीय सहकार्याच्या स्थिर प्रगतीचे भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी कौतूक केले. येत्या काळात भारत आणि अमेरिकेतील सामरिक भागीदारी आणखी वाढत जाईल याचा विश्वास भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केला. त्यानंतर नवी दिल्लीतील एका अभ्यासगटाशी बोलताना बेगन यांनी चीनचा उल्लेख ‘एलिफंट इन द रूम’ असा केला.

भारताबरोबर सामायिक सुरक्षा, भूराजकीय उद्दिष्ट्ये, समान हितसंबंध आणि मुल्यांवर आधारीत सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने प्रयत्‍न केले होते. पण चीनच्या समस्येमुळे हे सहकार्य प्रस्थापित होऊ शकले नव्हते. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांचा सहभाग असलेल्या ‘क्वाड’चा विस्तार करतानाही अशीच सावध भूमिका घेतली होती. मात्र येत्या काळात भारत आणि अमेरिकेतील संरक्षण व गोपनिय माहितीच्या आदानप्रदान विषयक सहकार्य तसेच ‘क्वाड’चा विस्तार शक्य असल्याचे बेगन यांनी स्पष्ट केले.

चार लोकशाहीवादी देशांनी एकत्र येऊन ‘क्वाड’ संघटीत केला आहे. हा गट एकसमान हितसंबंधांवर आधारीत असून कोणत्याही देशाविरोधात संघटीत झालेला गट नाही. स्वतंत्र आणि मुक्त इंडो-पॅसिफिक आणि एकसमान हितसंबंध असलेला कुठलाही देश या संघटनेत सहभागी होऊ शकतो, असे बेगन पुढे म्हणाले. यासाठी ‘असियान’मधील आग्नेय आशियाई देशांचा विचार सुरू असल्याचे बेगन म्हणाले. आतापर्यंत चीनच्या संकटाचा विचार करुन ‘क्वाड’चा विस्तार झाला नव्हता. पण यापुढे हा विस्तार शक्य असल्याची माहिती बेगन यांनी यावेळी दिली.

leave a reply