अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या सुरक्षादलांच्या कारवाईत १७० तालिबानी ठार

काबूल – अफगाणिस्तानच्या हेल्मंड प्रांतात अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या सुरक्षादलांच्या कारवाईत तालिबानचे १७० दहशतवादी ठार झाले. अमेरिकेने तालिबानच्या ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले चढविले. त्याचवेळी अफगाणिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनीही तालिबानवर जोरदार प्रतिहल्ला चढविला आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात हेल्मंडमध्ये तालिबान्यांनी मोठ्या प्रमाणावर हिंसक कारवाया केल्या आहेत. तालिबानच्या हल्ल्यांच्या भितीने हेल्मंडमधील हजारो स्थनिकांना विस्थापित व्हावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या सुरक्षादलांनी ही कारवाई हाती घेतली आहे.

सुरक्षादलांच्या कारवाईत

शनिवारी तालिबानने अफगाणिस्तानच्या हेल्मंडमधल्या ‘नाद-ए- अली’ आणि ‘बाबाजी’ भागात हल्ले केले होते. तालिबानने या भागातून अफगाणी जवानांना पिटाळून लावले आणि या भागांवर नियंत्रण मिळविले होते. तसेच तालिबानने हेल्मंडमधल्या वीज पुरवठा यंत्रणेवर हल्ला चढविला होता. त्यामुळे संपूर्ण हेल्मंड अंधारात होता. तसेच तालिबानने हेल्मंड-कंदहार महामार्गावरही ताबा मिळवला होता.

यानंतर अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या सुरक्षादलांनी हेल्मंडमध्ये तालिबानविरोधात जोरदार कारवाई हाती घेतली. रविवारी अमेरिकेने तालिबानच्या ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले चढविले. या हवाई कारवाईत ८० तालिबानी ठार झाल्याचे वृत्त आले होते. त्याचवेळी अफगाणिस्तानच्या सुरक्षादलांनीही तालिबानवर जोरदार प्रतिहल्ला चढविला. यामुळे या भागात तालिबान आणि अफगाणी सुरक्षादलांमध्ये जोरदार संघर्ष भडकला आहे. गेल्या दोन दिवसात या कारवाईत ठार झालेल्या तालिबानी दहशतवाद्यांची संख्या १७० वर पोहोचली आहे.

सुरक्षादलांच्या कारवाईत

अद्याप हा संघर्ष थांबलेला नाही. या संघर्षामुळे हेल्मंडमधील ४,५०० जण विस्थापित झाले आहेत. पुढच्या काळात हा संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचे सांगितले जाते. कतारची राजधानी दोहामध्ये अफगाणिस्तान आणि तालिबानमध्ये शांतीचर्चा सुरु असताना भडकलेला हा संघर्ष साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतो. तसेच या शांती चर्चेच्या यशावरही प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानातील अमेरिकेचे लष्करी कमांडर ऑस्टिन स्कॉट मिलर यांनी तालिबानने तातडीने हिंसाचार थांबवावा, असे बजावले आहे. अमेरिका आणि तालिबानमध्ये पार पडलेल्या शांतीकरार आणि अफगाणिस्तान-तालिबान शांतीचर्चेशी हे सुसंगत नसल्याचे मिलर यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका डिसेंबरपर्यंत अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेणार असल्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानात तालिबानच्या हल्ल्यांचे सत्र वाढल्याचे विश्लेषकांनी म्हटले आहे.

leave a reply