दोहा शांतीचर्चेमध्ये कठोर निर्णय घ्यावे लागतील

- अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल्लाह अब्दुल्लाह

दोहा/काबूल – कतारच्या दोहामध्ये अफगाणिस्तान सरकार व तालिबानमध्ये सुरु असलेली शांतीचर्चा अवघड बनत चालली असून, यादरम्यान कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल्लाह अब्दुल्लाह यांनी म्हटले आहे. तर तालिबानने अफगाण युद्धाचे कारण हा चर्चेचा मुद्दा हवा, अशी आक्रमक मागणी करून अफगाण सरकार व अमेरिकेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. अफगाणिस्तानातील अमेरिका व नाटोचे कमांडर जनरल स्कॉट मिलर यांनी शांतीचर्चेबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. शांतीप्रक्रियेशी निगडित बाजूंकडून वेगवेगळ्या भूमिका मांडण्यात येत असल्याने शांतीचर्चा सुरळीत पार पडण्याच्या शक्यतेवर शंका उपस्थित होत आहे.

शनिवारपासून कतारच्या दोहामध्ये अफगाणिस्तान आणि तालिबानमध्ये ऐतिहासिक शांतीचर्चेला सुरुवात झाली. अफगाणिस्तानच्या सरकारकडून अब्दुल्लाह अब्दुल्लाह या चर्चेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. पण ही चर्चा सोपी नसल्याचेे अब्दुल्लाह अब्दुल्लाह यांनी म्हटले. यामध्ये अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागणार असल्याचे त्यांनी मान्य केले. अफगाणिस्तानला या चर्चेदरम्यान अफगाणी जनतेचे हक्क, महिलांचे व अल्पसंख्यांकाचे अधिकार आणि नागरी स्वातंत्र्य सुरक्षित ठेवायचे असल्याचे अब्दुल्लाह अब्दुल्लाह म्हणाले. तसेच तालिबानने संघर्षबंदी पुकारावी, यावर अफगाणी शिष्टमंडळ जोर देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पण तालिबानकडून अफगाणिस्तानमध्ये अंतरिम सरकार स्थापनेसाठी धडपड सुरू झाल्याचे समोर येत आहे. त्यासाठी तालिबानकडून इस्लामी राजवट व अफगाण युद्धाचे कारण शांतीचर्चेचा भाग बनविण्याचा मुद्दा पुढे करण्यात येत आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानात हिंसाचार कायम ठेवून सरकारवर दबाव टाकण्याचेही प्रयत्न करण्यात येत आहेत. तालिबानने संघर्षबंदी पुकारली आणि चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही तर पुढे काय?, असा सवाल तालिबानचे प्रवक्ते करीत आहेत. दोन दशकांचे हे युद्ध शांतीचर्चेने संपणार नाही असे तालिबान सांगत आहेत.

त्यामुळे अफगाणिस्तानातील राजकीय नेत्यांनी तालिबानच्या हेतूंवर शंका उपस्थित करण्यास सुरुवात केली असून अब्दुल्लाह यांचे वक्तव्य त्याचाच भाग दिसत आहे. जनरल मिलर मात्र या शांतीचर्चेबाबत आशादायी आहेत. अफगाणिस्तानच्या जनतेसाठी शांतीचर्चा आवश्यक आहे, पण तालिबानचा हिंसाचारदेखील कमी व्हायला हवा, असे मत जनरल मिलर यांनी मांडले. त्याचवेळी गुरुवारी कतारमध्ये अफगाणिस्तान आणि तालिबानमध्ये चर्चाच झाली नसल्याचा दावा अफगाणी माध्यमांनी केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने अफगाणिस्तानसाठी नियुक्त केलेले विशेषदूत झल्मे खलिलझाद भारतभेटीवर आले होते. त्यावेळी अफगाणिस्तानच्या शांतीचर्चेवर बैठक पार पडली.अफगाणी शांतीचर्चेत भारताची भूमिका महत्त्वाची ठरेल, असे अमेरिकेने म्हटले होते. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी होता कामा नये, असा इशारा देऊन भारताची भूमिका स्पष्ट केली होती.

leave a reply