राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे चीनसमोर झुकणारे नेते

- माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टीकास्त्र

वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे चीनसमोर झुकणारे नेते असून, त्यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेची सतत मानहानी होत आहे. अमेरिकेचे स्थानही त्यांच्यामुळे खालवले आहे, अशी मर्मभेदी टीका माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. बायडेन प्रशासन हे अमेरिकेच्या इतिहासातील अत्यंत टोकाच्या डाव्या विचारसरणीकडे झुकलेले असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला. अमेरिकेसह सार्‍या जगाने एकमुखाने, कोरोनाच्या साथीसाठी चीनला जबाबदार धरून 10 ट्रिलियन डॉलर्सच्या नुकसानभरपाईची मागणी करावी, असा आक्रमक प्रस्ताव ट्रम्प यांनी ठेवला आहे.

राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे चीनसमोर झुकणारे नेते - माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टीकास्त्रअमेरिकेत पुढच्या वर्षी संसदेच्या प्रतिनिधीगृहासाठी निवडणूक होणार असून त्याच्या प्रचारमोहिमेला सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी ट्रम्प यांनी नॉर्थ कॅरोलिनामधील एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी बायडेन प्रशासनाविरोधात टीकेच्या जोरदार फैरी झाडल्या. चीन, कोरोनाची साथ, निर्वासितांचे लोंढे, पोलीस दलाचे खच्चीकरण, आर्थिक निर्णय अशा अनेक मुद्यांवर ट्रम्प यांनी आक्रमक वक्तव्ये करून लक्ष वेधून घेतले.

‘कोरोनाच्या मुद्यावर जगातील सर्व देशांनी एकत्र यायला हवे आणि एकमुखाने चीनच्या कम्युनिस्ट राजवटीविरोधात आवाज उठवायला हवा. कोरोनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून चीनल किमान 10 ट्रिलियन डॉलर्सचे बिल द्यायला हवे. सर्व देशांनी चीनकडून जर कोणते कर्ज घेतले असेल तर नुकसानभरपाई म्हणून ते रद्द करून टाकावे. अमेरिकेने चीनमधून आयात होणार्‍या सर्व उत्पादनांवर सरसकट 100 टक्के कर लादायला हवा’, अशा शब्दात अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी कोरोना प्रकरणी चीनला धडा शिकविण्याचे आवाहन केले.

ट्रम्प यांनी अमेरिकेत बायडेन प्रशासनाकडून डाव्या विचारसरणीला प्रोत्साहन दिले जात असल्याचाही आरोप केला. ‘अमेरिकेचे स्वातंत्र्य डाव्या विचारसरणीवर आधारलेल्या बहिष्काराच्या संस्कृतीने हिरावून घेतले आहे. बायडेन प्रशासन शाळांमधून अमेरिकी मुलांवर अत्यंत विषारी व वादग्रस्त वांशिक सिद्धांत आणि भेदभावाचे शिक्षण लादण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्यो बायडेन व त्यांचे समाजवादी डेमोक्रॅट्स हे अमेरिकेच्या इतिहासातील अत्यंत टोकाचे डाव्या विचरसरणीकडे झुकलेले सरकार आहे’, अशी जळजळीत टीका ट्रम्प यांनी केली.

बायडेन व डेमोक्रॅट पक्षाकडून ‘कॅन्सल कल्चर’, ‘डिफंडिंग कल्चर’चे समर्थन करण्यात येत असून या गोष्टी अमेरिका अधिक काळ खपवून घेणार नाही, असे माजी राष्ट्राध्यक्षांनी यावेळी बजावले. राष्ट्राध्यक्ष बायडेन अमेरिकी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करीत असून देशाच्या सीमा असुरक्षित बनल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला. त्याचवेळी रिपब्लिकन पक्ष अमेरिकी मूल्यांसाठी ठामपणे उभा राहून देशाला पुन्हा एकदा नव्या उंचीवर नेईल, अशी ग्वाही ट्रम्प यांनी यावेळी दिली.

leave a reply