इस्रायलशी जुळवून घेण्यासाठी तुर्की हमासच्या नेत्यांची हकालपट्टी करणार

अंकारा – इस्लामी देशांची एकजूट करून इस्रायलवर हल्ला चढविण्याची धमकी देऊन पॅलेस्टाईनची मुक्तता करण्याची गर्जना तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी केली होती. पण आता मात्र इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी, तुर्कीने हमास या जहाल पॅलेस्टिनी संघटनेच्या आपल्या देशातील नेत्यांची हकालपट्टी करण्याची तयारी केली आहे. तुर्कीच्या भूमिकेत झालेला हा बदल लक्षणीय ठरतो. इस्रायलशी जुळवून घेत असताना, तुर्कीने सौदी अरेबियाबरोबर संबंध सुधारण्याचीही तयारी केली आहे.

‘हुरियत डेली’ या तुर्कीच्या दैनिकाने ही बातमी प्रसिद्ध केली. पुढच्या महिन्यात इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयसॅक हर्झोग तुर्कीच्या भेटीवर येत आहेत. त्याच्या आधी तुर्कीने आपल्या इस्रायलविरोधी जहाल भूमिकेत फार मोठे बदल घडविले. २०१८ साली राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी इस्रायलमधील आपले राजदूत माघारी बोलाविले होते. तसेच जगभरातील इस्लामी देशांनी एकजुटीने इस्रायलवर हल्ला चढवावे, असे आवाहन राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी इस्तंबूलमध्ये आयोजित ‘ऑर्गनायझेशल ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’च्या बैठकीत केले होते.

तर त्याआधी इस्रायल हा दहशतवादी देश असल्याचा आरोप करून जेरूसलेम तुर्कीची ‘रेड लाईन’ असल्याचे एर्दोगन यांनी धमकावले होते. यासाठी रणगाडे घुसवून इस्रायलचे नेतृत्व उखडून टाकण्याची घोषणा एर्दोगन यांनी केली होती. गेल्या वर्षीच्या मे महिन्यापर्यंत तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्रायलवर हल्ले चढविण्याच्या धमक्या दिल्या होत्या. पण गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्राध्यक्ष एर्दोगन स्वत: इस्रायलशी जुळवून घेण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसत आहे.

पुढच्या महिन्यात इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष हर्झोग तुर्कीला भेट देणार आहेत. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी याचे स्वागत केले. तसेच ही भेट उभय देशांच्या संबंधासाठी सहाय्यक ठरेल, असा विश्‍वास राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी व्यक्त केला. पण इस्रायली राष्ट्राध्यक्षांच्या या भेटीआधी तुर्की आपल्या देशातील हमासच्या नेत्यांची हकालपट्टी करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी हमासच्या दहशतवाद्यांची यादी तयार केली असून फक्त हमासच्या राजकीय गटाशी संबंधित नेतेच तुर्कीमध्ये राहतील, अशी सूचना एर्दोगन यांनी केली आहे. तुर्कीच्या दैनिकानेच ही माहिती उघड केली.

राष्ट्राध्यक्ष एर्दोगन हे हमासचे समर्थक असून त्यांनी याआधी गाझातील इस्रायलच्या कारवाईवर जोरदार टीका केली होती. हमासचे नेते खालेद मेशाल आणि इस्माईल हनिया यांची भेट घेतली होती. पण आंतरराष्ट्रीय स्तरावरील बहिष्कार आणि अर्थव्यवस्थेला बसलेला हादरा, यामुळे एर्दोगन यांना आपल्या भूमिकेत बदल करणे भाग पडल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी तुर्कीच्या गुप्तचर यंत्रणेने इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादच्या साथीने तुर्कीमध्ये केलेल्या कारवाईत इराणच्या एजंट्स आणि स्लिपर सेलमधील दहशतवाद्यांना अटक केली होती. हे दहशतवादी तुर्कीतील इस्रायली व्यावसायिकाच्या हत्येच्या तयारीत होते, असा दावा तुर्कीच्या यंत्रणांनी केला होता.

दरम्यान, हमासप्रमाणे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन तुर्कीतील मुस्लिम ब्रदरहूडच्या नेत्यांची देखील हकालपट्टी करू शकतात, असा दावा केला जातो. अरब देशांना खुश करण्यासाठी एर्दोगन सरकार हे पाऊल उचलू शकतात, असे काही माध्यमांचे म्हणणे आहे.

leave a reply