तुर्कीच्या भूकंपातील बळींची संख्या 40 हजारांवर

- ही तर इस्तंबूलमधील भूकंपाची रंगीत तालीम असल्याचा संशोधकांचा इशारा

बळींची संख्याइस्तंबूल – तुर्की व सिरियातील भूकंपात 45 हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. एकट्या तुर्कीतील बळींची संख्या 40 हजारांवर पोहोचली असून अडीच लाखांहून अधिक इमारती, बंगले या भूकंपाने जमिनदोस्त केले आहेत. पण 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप म्हणजे इस्तंबूलमध्ये येणाऱ्या भूकंपाची रंगीत तालीम होती. तुर्कीच्या दुसऱ्या मोठ्या शहराला याहून अधिक तीव्रतेचा भूकंप हादरवून सोडेल, असा इशारा तुर्कीतील काही संशोधकांनी दिला आहे. हा इशारा प्रत्यक्षात उतरला तर याहून अधिक जीवित व वित्तहानी होईल, अशी चिंता स्थानिक माध्यमे व्यक्त करीत आहेत.

तुर्कीच्या दक्षिणेकडे भूकंपाचा हादरा बसण्याच्या दोन दिवस आधी युरोपिय संशोधकाने तुर्कीवर हे संकट कोसळणार असल्याचा दावा केला होता. गेल्या काही दशकातील आपल्या अभ्यासाअंती हा दावा केल्याचे सदर संशोधकाने म्हटले होते. पण तुर्कीतील काही संशोधकांनी स्थानिक वृत्तवाहिन्यांमधील कार्यक्रमात याहून अधिक भयावह दावे केले आहेत.

40 हजारांहून अधिक जणांचा बळी घेणारा तुर्कीतील हा भूकंप म्हणजे रंगीत तालिम होती, असे नेदिम सेनेर यांनी ‘हुरियत’ या स्थानिक वर्तमानपत्रात म्हटले आहे. टेक्टॉनिक प्लेट्सवर वसलेल्या इस्तंबूल शहराला याच तीव्रतेचा हादारा बसल्यास येथील किमान 13,500 इमारती जमिनदोस्त होतील. तर हजारो इमारतींचे मोठे नुकसान होईल. सध्या तुर्की अनुभवत असलेल्या जीवितहानीपेक्षाही अधिक प्रमाणात बळी इस्तंबूलमधील भूकंपात जातील, असा इशारा सेनेर यांनी दिला.

इस्तंबूल शहरातील 90 हजार बांधकाम भूकंपाच्या हादऱ्यांना सहन करू शकत नाहीत. तर एर्दोगन सरकारने तीन लाखांहून अधिक बांधकामांना कुठल्याही पडताळणीशिवाय मंजुरी दिली आहे. त्यामुळे इस्तंबूलमधील भूकंपाने अधिक मोठ्या संख्येने बळी जातील व त्यासाठी एर्दोगन सरकार जबाबदार असेल, असे इस्तंबूलचे मेयर एक्रेम इमामोग्लू यांनी बजावले. तर इस्तंबूलला भूकंपाचा झटका बसला तर 50 हजार ते दोन लाख जणांचा बळी जाईल, असा इशारा मुरत गुने या आणखी एका विश्लेषकाने दिला.

दरम्यान, तुर्कीतील बळींच्या वाढत्या संख्येसाठी राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांची बेजबाबदार धोरणे कारणीभूत असल्याची टीका तुर्कीत वाढू लागली आहे. एर्दोगन यांचे सरकार तुर्कीच्या जनतेच्या जीवावर उठल्याचा आरोप विरोधी पक्षनेते करीत आहेत.

leave a reply