तुर्कीकडून इराक-सिरियातील कुर्दांच्या ठिकाणांवर हल्ले

इराकी कुर्दांची तुर्कीविरोधात निदर्शने

iran kurd sulaimaniyah protestअंकारा/बगदाद – इराक-सिरियातील कुर्द संघटना दहशतवादी असल्याचा आरोप करुन तुर्कीने या देशांमधील कुर्दांच्या ठिकाणांवर हल्ले सुरू केले आहेत. यापैकी इराकच्या सुलेमानिया भागात तुर्कीने केलेल्या हल्ल्यात स्थानिकांचा बळी गेल्यानंतर कुर्दांनी तुर्कीविरोधात निदर्शने केली. दरम्यान, इराक-सिरियातील कुर्दांना लक्ष्य करुन तुर्की अमेरिकेला चिथावणी देत असल्याचा दावा केला जातो.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी कुर्द भागातील विमानतळावर जोरदार हल्ले झाले. या विमानतळाच्या सुरक्षेसाठी अमेरिका पुरस्कृत ‘सिरियन डेमोक्रॅटिक फोर्स-एसडीएफ’चे कुर्द जवान तैनात होते. तर त्याआधी इराकमधील कुर्दांच्या ठिकाणांनाही तुर्कीच्या लढाऊ विमानांनी लक्ष्य केले होते. कुर्दांना दहशतवादी ठरवून तुर्की कुर्दांचा वंशसंहार करीत असल्याचे आरोप झाले होते. तुर्कीने याकडे दुर्लक्ष केले होते.

turkey syria strikeपण रविवारी सुलेमानिया भागात जवळपास ४०० कुर्दांनी तुर्कीच्या या हल्ल्यांविरोधात निदर्शने केली. तसेच अमेरिका आणि युरोपिय देशांनी कुर्दांवरील हे हल्ले रोखावे, अशी मागणी या निदर्शनात करण्यात आली. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन हुकूमशहा असल्याची टीका देखील झाली. अमेरिका व युरोपिय देशांनी अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

अमेरिकेने इराक-सिरियातील ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेविरोधातील कारवाईत कुर्दांचा वापर केला होता. कुर्द म्हणजे दहशतवादविरोधी संघटनेतील महत्त्वाचे साथीदार असल्याचे अमेरिकेने म्हटले होते. पण आपल्या देशातील दहशतवादी हल्ल्यांसाठी कुर्द संघटना जबाबदार असल्याचा ठपका ठेवून तुर्कीने अमेरिकेबरोबर सहकार्य तोडण्याचे संकेत दिले होते. अमेरिका दहशतवादविरोधी कारवाईत दहशतवाद्यांचेच सहाय्य घेत असल्याचा आरोप तुर्कीने केला होता.

leave a reply