अन्नधान्याच्या किमतींचा भडका उडण्याची शक्यता

जागतिक व्यापार संघटनेचा दावा

Food pricesवॉशिंग्टन/मॉस्को – रशिया-युक्रेन युद्धात तोडगा निघण्याचे संकेत नसून या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर अन्नधान्याच्या किमतींचा पुन्हा एकदा भडका उडू शकतो, असा दावा जागतिक व्यापार संघटनेने केला आहे. गेल्या वर्षी अन्नधान्याच्या किमतीत जवळपास २० टक्क्यांची वाढ झाली होती, याकडेही जागतिक व्यापार संघटनेच्या नव्या अहवालात लक्ष वेधण्यात आले. त्याचवेळी पाश्चिमात्य देशांनी रशियन निर्यातीवर लादलेल्या छुप्या निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर उपासमारीचे भयावह संकट ओढवू शकते, असा आरोप ‘रशियन ग्रेन युनियन’ने केला आहे.

WTOगेल्या वर्षी सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर या दोन देशांमधून होणारी अन्नधान्याची तसेच खतांची निर्यात रोखली गेली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर महागाईचा प्रचंड भडका उडाला होता. आफ्रिकेसह आशिया, अमेरिका तसेच युरोपिय देशांच्या अर्थव्यवस्थांना जबरदस्त फटका बसला होता. युरोपातील बहुसंख्य जनतेला ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस’च्या संकटाचा सामना करावा लागला. संयुक्त राष्ट्रसंघटना व तुर्कीच्या मध्यस्थीने झालेल्या करारानंतर युक्रेनमधून अन्नधान्याची निर्यात सुरू झाली होती. मात्र त्यातील अन्नधान्य मोठ्या प्रमाणात युरोपिय बाजारपेठेत दाखल झाल्याचे समोर आले आहे.

याच पार्श्वभूमीवर जागतिक व्यापार संघटनेने दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. जागतिक अन्नधान्याच्या निर्यातीत रशियाचा वाटा जवळपास २० टक्क्यांचा आहे. ही निर्यात अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. त्याचवेळी रशियाने युक्रेनच्या अन्नधान्याच्या निर्यातीला मुदतवाढ देण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अन्नधान्याची टंचाई निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. याची जाणीव करून देत जागतिक व्यापार संघटनेने यावर्षीही अन्नधान्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे.

दरम्यान रशियातून अन्नधान्य निर्यात करणाऱ्या गटाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्बंध अद्याप कायम असल्याची तक्रार केली आहे.

leave a reply