लंडन/वॉशिंग्टन/मॉस्को – रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियन इंधनक्षेत्रासहित अर्थव्यवस्थेवर निर्बंध लादण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला होता. रशियन अर्थव्यवस्थेचा कणा मोडून युक्रेन युद्ध रोखण्याचे दावे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांसह आघाडीच्या अधिकारी व विश्लेषकांनी केले होते. मात्र त्याला वर्ष उलटल्यानंतरही अपवाद वगळता रशियाची अर्थव्यवस्था व युक्रेनवरील हल्ले या दोन्हींमध्ये फारसा फरक पडलेला नाही. उलट पाश्चिमात्य देशांनाच निर्बंधांचा त्रास सहन करावा लागत असून आता याच देशांकडून रशियाविरोधी धोरण सौम्य करण्याचे छुपे प्रयत्न सुरू झाले आहेत. रशियन इंधनाच्या व्यापारात सहभागी असलेल्या कंपन्यांना अमेरिकी यंत्रणांकडून प्रोत्साहन दिले जात असल्याचा दावा ब्रिटनमधील आघाडीच्या दैनिकाने केला आहे.
गेल्या महिन्यात अमेरिकेसह ‘जी७’ व युरोपिय महासंघाने रशियन इंधनाच्या दरांवर मर्यादा निश्चित करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली होती. रशियाचे कच्चे तेल प्रति बॅरल ६० डॉलर्स व त्याखालील किमतीत विकण्याची परवानगी देण्यात आली होती. असे न करणाऱ्या देशांवर तसेच संबंधित व्यवहारात सहभागी असणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचा सज्जड इशारा देण्यात आला होता. मात्र या अंमलबजावणीनंतरही रशियन इंधनाच्या व्यापारात फार मोठा फरक पडल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे यासाठी पुढाकार घेणाऱ्या अमेरिकेनेच रशियन इंधनाच्या व्यापारात सहभागी असणाऱ्या कंपन्यांना व्यापार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. बायडेन प्रशासनाने यासंदर्भात काही बैठका घेऊन कंपन्यांना सूचना केल्याचा दावा ‘द फायनान्शिअल टाईम्स’ या आघाडीच्या दैनिकाने केला. इंधनव्यापाराचा भाग असलेल्या ‘ट्राफिग्युरा’ व ‘गन्व्हर’सारख्या कंपन्यांनी अशा प्रकारचे निर्देश मिळाल्याची माहिती ब्रिटीश दैनिकाला दिली.
अमेरिकी यंत्रणांना रशियन इंधनाचा व्यापार सुरू ठेवायचा आहे, असे दिसते. त्यामुळे त्यांच्याकडून नियमांची अंमलबजावणी अथवा कारवाईबाबत फारशी कठोर भूमिका घेण्यात आलेली नाही, अशी माहिती एका आघाडीच्या इंधन उद्योजकाने ब्रिटीश दैनिकाला दिली आहे. दरम्यान, आखाती देशांनी रशियाकडून इंधन व निगडित उत्पादनांची आयात वाढविल्याचे उघड झाले आहे.
आखातातील आघाडीचा इंधनउत्पादक देश असणाऱ्या सौदी अरेबियात नुकतेच एक लाख, ९० हजार टन डिझेल आयात झाल्याची माहिती समोर आली. काही दिवसांपूर्वी रशियाच्या प्रायमोस्क बंदरात सौदी अरेबियासाठी अजून ९९ हजार टन डिझेल भरलेली जहाजे दिसून आल्याचे ‘रेफिनिटिव्ह’ या वेबसाईटने म्हटले आहे.
English