‘यूएई’ने पाकिस्तान बरोबरची विमानसेवा बंद केली

लंडन – ‘संयुक्त अरब अमिरात’ने (यूएई) पाकिस्तानबरोबरची विमानसेवा पुढील काही दिवसांसाठी बंद केली आहे. कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे ‘युएई’ने जाहीर केले. पाकिस्तानातून दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी स्वतंत्र कोरोना लॅब उभारल्यानंतरच ही विमानसेवा सुरू करण्यात येईल, असे ‘यूएई’ने स्पष्ट केले. पाकिस्तानातून आलेल्या प्रवाशांमुळे ब्रिटनमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे उघड झाल्यानंतर, ‘यूएई’ने हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या दोन लाखांच्याही पलिकडे गेली आहे.

विमानसेवा, ‘यूएई’, पाकिस्तान

यूएईच्या ‘जनरल सिविल एविएशन ऑथॉरिटी’ने पाकिस्तानबाबतचा हा निर्णय जाहीर केला. पाकिस्तानच्या विमानसेवांवरील बंदी ही तात्पुरती असल्याचे युएई’च्या यंत्रणेने स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी ‘यूएई’च्या एमिराट्स या विमान कंपनीने देखील पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व प्रवाशांवर बंदी घातली होती. गेल्या आठवड्यात ‘एमिराट्स’च्या विमानातून हॉंगकॉंगला गेलेले ३० पाकिस्तानी प्रवासी कोरोनाग्रस्त असल्याची उघड झाले होते. पाकिस्तानी यंत्रणा कोणतीही वैद्यकीय चाचणी केल्याशिवाय प्रवाशांना विमानात प्रवेश देत असल्याची नाराजी व्यक्त करून एमिराट्स या विमानसेवा कंपनीने पाकिस्तानातील विमानसेवेवर तसेच पाकिस्तानी प्रवाशांवर बंदी टाकली होती. युएई’च्या यंत्रणेने ‘एमिराट्स’च्या या निर्णयाचे अनुकरण केल्याचे दिसत आहे.

पाकिस्तानातून दाखल होणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोनाची स्वतंत्र लॅब उभारल्याशिवाय ही बंदी उठवणार नसल्याचे ‘युएई’ने स्पष्ट केले. ‘यूएई’चा जनतेच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याचे सदर यंत्रणेने सांगितले. फक्त युएई नाही तर दोन दिवसांपूर्वी ब्रिटनने देखील पाकिस्तानातून दाखल होणाऱ्या प्रवाशांवर नाराजी व्यक्त केली होती. ब्रिटनमधील कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येसाठी पाकिस्तानातून दाखल झालेले नागरिक जबाबदार असल्याचा आरोप ब्रिटनच्या आरोग्य यंत्रणेने केला होता. या पाकिस्तानी प्रवाशांची संख्या हजारोंनी असल्यामुळे ब्रिटिश यंत्रणांनी तीव्र चिंता व्यक्त केली होती.

दरम्यान, पाकिस्तानातील कोरोनाग्रस्तांची संख्या २,०६,५१२ वर पोहोचली असून या देशात दर दिवशी चार हजाराहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. त्यातच पाकिस्तानी यंत्रणा देशातील कोरोनाची खरी परिस्थिती दडवित असल्याचा आरोपही होत आहे.

leave a reply