हा २०२० सालचा भारत आहे, हे लक्षात ठेवा – भारताच्या माजी लष्करप्रमुखांचा चीनला इशारा

नवी दिल्ली – दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनुसार, चीनचे जवान माघार का घेत नाहीत, ते पाहण्यासाठी भारतीय सैन्याचे पथक चीनच्या तंबूपर्यंत पोहोचले होते. त्यावेळी, चिनी लष्कराच्या तंबूने पेट घेतला आणि त्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष सुरु झाला, अशी माहिती भारताचे माजी लष्करप्रमुख व केंद्रीयमंत्री व्ही. के. सिंग यांनी दिली. त्याचवेळी हा १९६२ सालचा भारत नाही, २०२० सालातला भारत आपल्यासमोरील कुठलाही पर्याय स्विकारताना कचरणार नाही, असा इशारा व्ही. के. सिंग यांनी चीनला दिला आहे.

२०२०

गलवान व्हॅलीत झालेला संघर्ष भारताच्या हद्दीत झाला की चीनच्या हद्दीत? हा संघर्ष चीनच्या हद्दीत झाला असेल तर भारतीय सैनिक चीनच्या हद्दीत कसे गेले, असे प्रश्न काही जणांकडून उपस्थित करण्यात येत होते. तसेच भारताची भूमी चिनी लष्कराने बळकावली नसेल, चीनने नक्की घुसखोरी कुठे केली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. या साऱ्या प्रश्नांना माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी उत्तरे दिली. दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनुसार, चीनचे लष्कर आपल्या हद्दीतूनही माघार घेणार होते. पण ठरल्यानुसार, चिनी जवानांनी इथून माघार का घेतली नाही, याची चौकशी करण्यासाठी भारतीय सैन्याचे पथक १५ जूनच्या मध्यरात्री चीनच्या तंबूजवळ पोहोचले, असे व्ही. के. सिंग यांनी स्पष्ट केले.

या दरम्यान, चिनी लष्कराच्या तंबूने आकस्मिकरित्या पेट घेतला आणि त्यानंतर इथे घनघोर संघर्ष सुरू झाला. चीनच्या जवानांनी लोखंडी सळ्या, कुंपणाच्या काटेरी तारा यांचा वापर करुन भारतीय सैनिकांवर हल्ला चढविला. तर भारतीय सैनिक हातांनी आणि दगडाचा वापर करुन इथे लढत होते. या सीमेवर दोन्ही देशांच्या लष्कराला गोळीबार करण्याची परवानगी नाही. अन्यथा इथे हाहाकारच माजला असता. इथे लढत असलेल्या दोन्ही देशांच्या सैनिकांनी कुमक मागविली. चिनी लष्कराला ही कुमक लवकर मिळाली, तर भारतीय सैनिक इथे थोडे उशिरा पोहोचले. यांनतर झालेल्या संघर्षात भारताचे २० सैनिक शहीद झाले तर हा संघर्ष छेडणाऱ्या चीनला आपले ४३ जवान गमवावे लागले, अशी माहिती व्ही. के. सिंग यांनी दिली.

चीन आपले जवान ठार झाले, याची माहिती उघड करीत नाही. पण भारताने मात्र आपल्या शहीदांचा सन्मान केला. हा दोन्ही देशांच्या व्यवस्थेमधला फरक माजी लष्करप्रमुखांनी लक्षात आणून दिला. १९५९ साली चीनने भारताकडे दावा सांगणारा नकाशा दिला होता. यानुसार चीनचे लष्कर सदर निर्मनूष्य भूभागात गस्त घालत आले आहेत. कित्येकदा भारतीय सैनिक व चीनचे जवान गस्त घालताना एकमेकांसमोर खड़े ठाकले होते. पण त्यांच्यात संघर्ष होत नव्हता. मात्र गेल्या पाच-सहा वर्षांपासून दोन्ही बाजूने धक्काबुक्की सुरू झाली. याचे प्रमुख कारण भारताचे सैनिक इथे गस्त घालणाऱ्या चिनी जवानांना रोखू लागले होते. हेच चीनच्या अस्वस्थतेचे मुळ कारण आहे, असे व्ही. के सिंग यांनी म्हटले आहे. तसेच एका इसमाच्या अतिरेकी महत्वाकांक्षेमुळे हा सीमावाद भडकल्याचा दावा करुन माजी लष्करप्रमुखांनी थेट नामोल्लेख न करता चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना लक्ष्य केले.

मात्र, हा १९६२ सालचा भारत नाही. २०२० सालच्या भारतीय लष्कराकडे आवश्यक असलेली सारी सन्साधने आहेत आणि या भारताचे नेतृत्त्वही खंबीर आहे, अशा शब्दात व्ही. के. सिंग यांनी चीनला इशारा दिला. पाश्चिमात्य देशांमधील सामरिक विश्लेषक व मुत्सद्दी देखील प्रत्यक्ष युद्धात भारत चीनवर वर्चस्व गाजविल, असा निष्कर्ष नोंदवित आहेत. भारतीय संरक्षणदलांची क्षमता, अनुभव व कौशल्य जमेस धरले तर कित्येक वर्षात युद्ध न खेळलेल्या चीनचा भारतासमोर निभाव लागू शकणार नाही, असे हे सामरिक विश्लेषक व मुत्सद्दी छातीठोकपणे सांगत आहेत. मात्र चीन प्रचारयुद्धात अतिशय पारंगत असलेला देश आहे. त्याचा वापर करुन आपण भारताला दडपणाखाली आणल्याचा भ्रम चीन उभा करीत आहे. पण चीनच्या या प्रचारयुद्धाचा प्रभाव पडेनासा झाला असून गलवान व्हॅलीतील संघर्षात जबरदस्त पराक्रम गाजवून भारतीय सैनिकांनी चीनच्या प्रचारयुद्धाची हवाच काढून घेतल्याचे भारताचे इतर माजी लष्करी अधिकारी अभिमानाने सांगत आहेत.

leave a reply