रॉकेट हल्ले चढविणार्‍या हमासला युएईचा इशारा

- सौदी, इजिप्तकडून संघर्षबंदीचे आवाहन

दुबई – हमासने इस्रायलवरील रॉकेट हल्ले रोखले नाही तर गाझापट्टीतील पायाभूत सुविधांसाठीची गुंतवणूक रोखण्यात येईल, असा इशारा संयुक्त अरब अमिरातीने (युएई) दिला आहे. युएईच्या वरिष्ठ अधिकार्‍याने नाव उघड न करण्याच्या अटीवर ही माहिती इस्रायली वर्तमानपत्राला दिली. तर सौदी अरेबिया आणि इजिप्तने गाझापट्टीतील संघर्ष थांबवून संघर्षबंदी जाहीर करावी, असे आवाहन केले आहे.

रॉकेट हल्ले चढविणार्‍या हमासला युएईचा इशारा - सौदी, इजिप्तकडून संघर्षबंदीचे आवाहनगेल्या आठवड्याभरापासून जेरूसलेम तसेच इस्रायल-हमासमधील संघर्षाबाबत आखाती देश भूमिका घेत नसल्याची टीका सुरू होती. इस्लामी देशांच्या ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन-ओआयसी’ देखील ठोस निर्णयावर पोहोचली नसल्याची चर्चा होती. पण रविवारी पार पडलेल्या बैठकीत ओआयसीने इस्रायलवर टीका केली.

तर सौदी व इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इस्रायल व हमासला संघर्षबंदीचे आवाहन केले. मानवतावादी सहाय्यासाठी निदान काही तासांची संघर्षबंदी जाहीर करा, अशी मागणी इजिप्तने केली आहे.

दरम्यान, कतारच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हमासचा वरिष्ठ नेता इस्माईल हनियाची भेट घेतल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचबरोबर कतारने गाझातील पॅलेस्टिनींसाठी पाच कोटी डॉलर्सचे सहाय्य पुरविल्याचाही दावा केला जातो.

गाझातील हमास व इतर दहशतवादी संघटनांना इराणकडून शस्त्रे तर कतारकडून प्रचंड प्रमाणात पैसा पुरविला जात असल्याचे आरोप होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर कतारने पॅलेस्टिनींसाठी जाहीर केलेले हे सहाय्य लक्षवेधी ठरते.

leave a reply