जर्मनीचे चॅन्सेलर शोल्झ यांच्या भारतभेटीत युक्रेन युद्धावर चर्चा होईल

- जर्मनीच्या भारतातील राजदूतांचा दावा

नवी दिल्ली – भारत रशियाकडून इंधनाची खरेदी करीत आहे, यात आम्हाला आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. रशियाकडून माफक दरात इंधन खरेदी करतो, म्हणून भारताला दोष देता येणार नाही, असे जर्मनीचे भारतातील राजदूत फिलिप ॲकरमन यांनी केला. जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ २५ फेब्रुवारी रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याच्या आधी भारत व रशियाच्या इंधनव्यवहारावरील आपली भूमिका स्पष्ट करून जर्मनी चॅन्सेलर शोल्झ यांच्या दौऱ्याची पूर्वतयारी करीत असल्याचे दिसते. असे असले तरी चॅन्सेलर शोल्झ यांच्या या दौऱ्यात युक्रेनच्या युद्धाचा मुद्दा ऐरणीवर असेल, असे दावे केले जातात.

अमेरिकेसह युरोपिय देशांनी देखील भारत रशियाकडून खरेदी करीत असलेल्या इंधनावर चिंता व्यक्त केली होती. मात्र भारताच्या विरोधात थेट विधाने करण्याचे युरोपिय देशांनी टाळले होते. पण आता युरोपिय देशांचा या इंधनव्यवहाराला असलेला विरोध मावळत चालल्याचे समोर येत आहे. जर्मनीच्या राजदूतांनी केलेला खुलासा याची साक्ष देत आहे. याबरोबरच जगासमोर आर्थिक मंदीचे संकट खडे ठाकलेले असताना, भारताबरोबरील सहकार्य वाढविण्यासाठी विकसित देशांमध्ये स्पर्धा सुरू झाली असून या स्पर्धेत आपण मागे पडणार नाही, याची दक्षता जर्मनी घेत असल्याचे दिसते. चॅन्सेलर शोल्झ यांच्या दौऱ्यात भारताबरोबरील आर्थिक सहकार्याला विशेष महत्त्व दिले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
याबरोबरच युक्रेनच्या युद्धाबाबत भारताच्या नेत्यांशी चॅन्सेलर शोल्झ महत्त्वपूर्ण चर्चा करणार असल्याचे दावे माध्यमांनी केले आहेत. भारतातील फ्रान्सच्या राजदूतांनी देखील भारत व फ्रान्स युक्रेनचे युद्ध थांबविण्यासाठी वारंवार चर्चा करीत असल्याचे नुकतेच जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर, चॅन्सेलर शोल्झ भारताशी युक्रेनच्या युद्धाबाबत करणार असलेल्या चर्चेचे महत्त्व अधिकच वाढले आहे. भारताचा रशियावर फार मोठा प्रभाव असून या प्रभावाचा वापर युक्रेनचे युद्ध रोखण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा युरोपिय देशांनी याआधी व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने देखील तशा स्वरुपाचे संकेत दिले होते. मात्र यावर भारताची प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान, शोल्झ यांच्या या भारतभेटीत इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबतही चर्चा अपेक्षित असल्याचे दावे केले जातात. या सागरी क्षेत्रातील चीनच्या चिंताजनक कारवायांपासून जर्मनीचे हितसंबंध देखील धोक्यात येत असल्याने, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील महत्त्वाचा देश म्हणून चॅन्सेलर शोल्झ भारताशी चर्चा करणार आहेत. याबरोबरच जर्मनी भारताला पाणबुड्या पुरविण्यासाठी उत्सुक असून संरक्षणक्षेत्रातील या सहकार्यावरही चॅन्सेलर शोल्झ यांच्या भारतभेटीत वाटाघाटी होऊ शकतील, असा दावा जर्मनीचे राजदूत ॲकरमन यांनी केला आहे.

leave a reply