अमेरिका-चीनमधील स्पर्धेमुळे ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षेला मोठा धोका

- ऑस्ट्रेलियन गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांचा इशारा

सिडनी – गेल्या काही वर्षांपासून इंडो-पॅसिफिक क्षेत्र अमेरिका व चीन या दोन महासत्तांमधील स्पर्धेत भरडला जात आहे. गोपनीय माहिती मिळविण्याच्या प्रयत्नात हे दोन्ही देश ऑस्ट्रेलियातील हस्तक्षेप वाढवित आहेत. यामुळे याआधी इतिहासात कधीही झाले नसेल, एवढ्या मोठ्या संख्येने ऑस्ट्रेलियन जनतेला लक्ष्य केले जात आहे’, असा इशारा ऑस्ट्रेलियन गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख माईक बर्गिस यांनी दिला. ऑस्ट्रेलियन न्यायाधीश, पत्रकार आणि माजी लष्करी अधिकारी या हेरगिरीला बळी पडत असल्याचा दावा बर्गिस यांनी केला.

ऑस्ट्रेलियातील राजकीय तसेच शैक्षणिक व्यवस्थेत चीनच्या हेरांनी मोठ्या प्रमाणात घुसखोरी केल्याचे आरोप याआधी चीनवर झाले होते. चीनची ही घुसखोरी आमच्या देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा आरोप ऑस्ट्रेलियन सरकारने केला होता. यासाठी चीनविरोधात कठोर पावले उचलली होती. पण यामुळे चीनच्या हेरांपासून असलेला धोका कमी झालेला नसल्याची कबुली ऑस्ट्रेलियन यंत्रणांनी दिली होती.

मंगळवारी ‘ऑस्ट्रेलियन सिक्युरिटी इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन-एएसआयओ’ या गुप्तचर यंत्रणेचे संचालक माईक बर्गिस यांनी वार्षिक अहवालाच्या निमित्ताने अमेरिका व चीनमधील स्पर्धेपासून वाढत असलेला धोका माध्यमांसमोर मांडला. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख सहकारी देश असलेल्या अमेरिकेला चीनकडून सर्वच स्तरावर स्पर्धा मिळत असल्याचे बर्गिस यांनी म्हटले आहे. साऊथ चायना सी, तैवानचे आखात आणि कोरियन पेनिन्सूला या क्षेत्रात चीन अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देत असल्याची आठवण बर्गिस यांनी करुन दिली.

या क्षेत्रातील एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी अमेरिका व चीनमध्ये स्पर्धा पेटली आहे. यासाठी हे दोन्ही देश ऑस्ट्रेलियाचा वापर करीत असल्याचा दावा बर्गिस यांनी केला. ऑस्ट्रेलिया हा अमेरिकेचा मित्रदेश असल्यामुळे अमेरिकेची माहिती मिळविण्यासाठी चीनने ऑस्ट्रेलियात मोठी घुसखोरी केली आहे. तर चीनवर नजर ठेवण्यासाठी अमेरिकेनेही ऑस्ट्रेलियाचीच निवड केली आहे, याकडे बर्गिस यांनी लक्ष वेधले. एकमेकांवरील या हेरगिरीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यायाधीश, पत्रकार आणि माजी लष्करी अधिकाऱ्यांचा वापर केला जात असल्याचा दावा बर्गिस यांनी केला.

याआधीही कधीही ऑस्ट्रेलियामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हेरगिरी झाली नव्हती. पण गेल्या काही वर्षांपासून याची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढल्याचे बर्गिस यांनी स्पष्ट केले. पैशांसाठी हुकूमशाही राजवटीला आपले ईमान विकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या माजी लष्करी अधिकाऱ्यांवरही बर्गिस यांनी टीका केली. थेट उल्लेख न करता बर्गिस यांनी चीनला लक्ष्य केल्याचे दिसत आहे. या हेरगिरीमुळे ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचे बर्गिस म्हणाले.

leave a reply