नवी दिल्ली – युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी भारताच्या रशियाबरोबरील इंधन व्यवहारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या व्यवहारामुळे भारताला रशियाकडून स्वस्तात इंधन उपलब्ध होत असेल, पण याने युक्रेनच्या यातनांमध्ये अधिक भर पडत आहे, असे भावनिक आवाहन युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत परराष्ट्रमंत्री कुलेबा यांनी हे दावे करून भारताने रशियाकडून इंधनाची खरेदी करू नये, अशी मागणी केली. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी संसदेत बोलताना युक्रेनच्या या आक्षेपाला उत्तर दिले. भारताने आपल्या इंधनकंपन्यांना रशियाकडून इंधन खरेदी करा, असे आदेश दिलेले नाहीत. मात्र देशहिताच्या दृष्टीकोनातून व्यवहार्य निर्णय घेऊन भारतीय कंपन्या रशियाकडून इंधनाची खरेदी करीत आहेत, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी म्हटले आहे.
युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतर, पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या इंधन निर्यातीला लक्ष्य करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. पण चीन व भारत या देशांना इंधनाचा पुरवठा वाढवून रशियाने आपल्यावरील निर्बंधांना प्रत्युत्तर दिले. रशियाने भारताला विशेष सवलतीच्या दरात इंधन पुरविण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर भारताने रशियाकडून इंधनाची खरेदी वाढविली होती. यावर अमेरिका व युरोपिय देशांनी जोरदार आक्षेपन नोंदविले, अमेरिकेने तर भारताला याच्या गंभीर परिणामांची धमकी दिली होती. पण भारत रशियाकडून खरेदी करीत आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात युरोपिय देश अजूनही रशियाकडून इंधनाची खरेदी करीत असल्याची बाब लक्षात आणून दिली होती. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आपल्या युरोप दौऱ्यात यावर बोट ठेवून युरोपिय देश तसेच अमेरिकेच्या दुटप्पी धोरणावर प्रश्न उपस्थित केले होते.
मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा युक्रेन हा मुद्दा उपस्थित करून रशियाकडून इंधन खरेदी करणाऱ्या भारतावर दडपण वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, भारत रशियाकडून खरेदी करीत असलेल्या इंधनामुळे युक्रेनच्या यातनांमध्ये भर पडत असल्याची खंत व्यक्त केली. भारताने स्वस्त इंधनासाठी युक्रेनच्या यातनांमध्ये भर घालू नये, असे आवाहन देखील परराष्ट्रमंत्री कुलेबा यांनी केले. तसेच भारताने आपल्या परराष्ट्र धोरणात युक्रेनला अनुकूल बदल करावे, अशी मागणी कुलेबा यांनी केली आहे.
त्या पार्श्वभूमीवर, भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पुन्हा एकदा संसदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, भारताची भूमिका स्पष्ट केली. भारताने आपल्या इंधन कंपन्यांना रशियाकडून इंधनाच्या खरेदीचे आदेश दिलेले नाहीत. देशहिताच्या दृष्टीकोनातून उत्तम डील करण्याचा भारतीय इंधन कंपन्यांचा हेतू असतो. रशियाबरोबरील भारतीय इंधनकंपन्यांच्या व्यवहारामागे देखील हाच व्यवहार्य दृष्टीकोन आहे, असे सांगून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी देशाची भूमिका स्पष्ट केली. रशियापेक्षाही अधिक स्वस्तात कुणी इंधन उपलब्ध करून दिले, तर भारतीय इंधन कंपन्या तो पर्याय स्वीकारतील, ही बाब परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी लक्षात आणून दिली. राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर बोलत होते.
दरम्यान, आपल्या निर्बंधांचा रशियाच्या इंधन निर्यातीवर विशेष परिणाम झालेला नाही, यामुळे अमेरिका व युरोपिय देश अस्वस्थ झाले आहेत. यामुळेच रशियाकडून इंधनाची खरेदी करणाऱ्या भारताला लक्ष्य करण्याची तयारी या देशांनी केली आहे. इतकेच नाही तर पाश्चिमात्यांच्या निर्बंधांचा फटका बसल्यामुळे रशियाने आपल्या उद्योगक्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या सुमारे ५०० उत्पादनांची यादी भारताकडे सोपविल्याच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याला प्रतिसाद देऊन भारताने देखील रशियाला आवश्यक असलेल्या उत्पादनांची यादी तयार करून या उत्पादनांसाठी रशियाने आपली बाजारपेठ खुली करावी असे आवाहन केले होते. यानंतर पुन्हा एकदा युक्रेनने रशियाबरोबरील इंधन व्यवहारांवरून भारतावर दडपण वाढविण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसते आहे.