युक्रेनचे युद्ध व चीनमुळे जपानच्या सुरक्षेला धोका वाढतोय

-जपानच्या संरक्षण श्वेतपत्रकातील इशारा

Japan Ground Self-Defense Force Miyako campटोकिओ – ‘पूर्व युरोपमध्ये पेटलेल्या युक्रेन युद्धावर आणि तैवानबाबतच्या चीनच्या हालचालींवर जपान बारीक लक्ष ठेवून आहे. कारण या दोन्ही घडामोडींमुळे जपानच्या सुरक्षेला दीर्घकालिन धोका वाढत आहे’, असा इशारा जपानच्या वार्षिक संरक्षण अहवालातून दिला आहे. त्याचबरोबर आपली संरक्षण सज्जता वाढविण्यासाठी जपान लवकरच लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रांची खरेदी करू शकतो, असे संकेत यातून देण्यात आले. दरम्यान, जपानच्या या श्वेतपत्रकामुळे चीन खळवला आहे. स्वत:चा लष्करी विस्तार करण्यासाठी जपान सबबी देत असल्याचा आरोप चीनने केला आहे.

जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी मंजुरी दिलेली जपानची वार्षिक लष्करी श्वेतपत्रिका शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे जपानने या अहवालात आपल्या सुरक्षेला असलेल्या धोक्यांचा उल्लेख केला. तसेच या धोक्यांविरोधात सज्जता ठेवण्यासाठी जपानचे धोरण याची माहिती श्वेतपत्रिकेत देण्यात आली आहे. पण यंदाच्या अहवालात जपानने रशिया-युक्रेनमधील युद्ध आणि रशिया-चीनमधील लष्करी सहकार्य यांचा प्रामुख्याने उल्लेख केला.

japan-defenceयुक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे दूरगामी परिणाम जपानसह इंडो-पॅसिफिक क्षेत्रातही जाणवतील. रशियाची आक्रमकता खपवून घेतली तर एकतर्फी कारवाई करुन आशियातील यथास्थिती देखील बदलता येईल, असे चुकीचे संकेत जातील, असे या श्वेतपत्रिकेत म्हटले आहे. उघड उल्लेख न करता रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या कारवाईमुळे चीन देखील इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अशीच आक्रमकता दाखवू शकतो, असे संकेत जपानच्या लष्करी अहवालाने दिले आहेत.

japan-defence-white-paperकाही दिवसांपूर्वी जपानचे पंतप्रधान किशिदा यांनी ‘आज युक्रेन तर उद्या पूर्व आशियावर हल्ला होईल’, असे सांगून जगाचे लक्ष वेधून घेतले होते. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या लष्करी श्वेतपत्रिकेत जपानच्या संरक्षण मंत्रालयाने चीनपासून तैवानच्या सुरक्षेला असलेला धोका अधोरेखित केला. जागतिक सत्ताकेंद्र बदलू लागले आहे, देशादेशांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे आणि अशा काळात चीनच्या आक्रमक लष्करी सज्जतेमुळे जगातिक समीकरणे अधिक जटील होऊ लागल्याचे या अहवालात म्हटले आहे.

तैवानच्या सुरक्षेला याआधीही चीनपासून धोका होताच. पण रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे चीनच्या धोक्यात वाढ झाली आहे. त्यातच तैवानच्या प्रश्नावरुन अमेरिका आणि चीनमध्ये वाढत असलेल्या वाद देखील या क्षेत्रातील तणाव वाढवित आहे. गेल्या वर्षभरात चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी करण्याच्या प्रमाणातही वृद्धी झाली आहे, याकडे या श्वेतपत्रिकेने लक्ष वेधले. येत्या काळात चीनने तैवानव हल्ला चढविलाच तर त्याचा थेट धोका जपानला देखील असेल, असा इशारा या अहवालाने दिला. याआधीही तैवानवरील चीनच्या हल्ल्यामुळे जपानमध्ये आणीबाणी येऊ शकते, असे बजावले होते. तर जपानचे दिवंगत माजी पंतप्रधान ॲबे शिंजो यांनी अमेरिकेकडे तैवानच्या सुरक्षेबाबत ठाम भूमिका घेण्याची मागणी केली होती.

leave a reply